वैजापूर - तालुक्यातील कोल्ही मध्यम प्रकल्पातील ९४ टक्के पाणी साठ्यातून सिंचनासाठी पाणी आवर्तन सोडायचे की पिण्यासाठी
राखीव ठेवायचे, या परस्परविरोधी मागणीवर भाजप व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पाणीवाटपाच्या चढाओढीवर पालकमंत्री रामदास कदम यांनी प्रकल्पातील ४० टक्के पाणी तीन गावांची तहान भागवण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. धरणातील उर्वरित शिल्लक पाणीसाठ्यातून लाभक्षेत्रातील तीन गावांना सिंचनासाठी पाणी आवर्तन कालव्याच्या डागडुजीचे काम पूर्ण झाल्यानंतर सोडण्यात येणार आहे. दरम्यान, धरणातील पाण्याचा वरील भागातील शेतकऱ्यांकडून ७० ते ८० विद्युत मोटारींद्वारे उपसा सुरू असल्याने सिंचन व पिण्यासाठी धरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहतो की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.
सेनेचे पालकमंत्री कदम यांनी प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यासाठी आग्रही असलेल्या मित्रपक्ष भाजपच्या मागणीवर ४० टक्के पाणी आरक्षित करून त्यांना दिलासा दिला, तर दुसऱ्या बाजूने सिंचनासाठी कालव्यात पाणी सोडावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाणी देण्याच्या मागणीचा मार्ग मोकळा करून दोन्ही पक्षांचे समाधान केल्याचे बोलले जात आहे. कोल्ही मध्यम प्रकल्प सहा वर्षांनंतर यंदा दमदार पाऊसमानामुळे तुडुंब भरला. एकूण ३.२६ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या या धरणात डिसेंबर २०१६ महिनाअखेरीस ९४ टक्के पाणीसाठा होता. लाभक्षेत्रातील गावांना पिण्यासाठी पाणी सोडावे या मागणीसाठी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिनकर पवार यांनी नांदूर मधमेश्वर विभागाकडे लेखी पत्र देऊन पाठपुरावा सुरू केला होता. दुसऱ्या बाजूने कोल्हीचे सरपंच कैलास पवार यांनी धरणाचा १३ किमी लांबीचा कालवा अनेक वर्षांपासून नादुरुस्त असल्यामुळे कालव्यात सोडलेल्या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून नुकसान होईल म्हणून पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या भूमिकेत होते. तसेच या धरणातून पाणीपुरवठा असलेल्या ग्रामपंचायतीने पाणी आरक्षित करण्याचे ठराव संबंधित विभागाकडे दिले होते.
दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर : कोल्ही प्रकल्पाच्या १३ किमी लांबीच्या कालव्याद्वारे बोरसर, भिवगाव, सुदामवाडी अशा लाभक्षेत्रातील तीन गावांतील ३२४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचे प्रकल्पीय तरतूद आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा पावसाअभावी न झाल्यामुळे कालव्याची जागोजागी मोठ्या प्रमाणावर तुटफूट झाली आहे. कालव्यालगतच्या शेतकऱ्यांनी कालव्याची दुरुस्ती केल्यांनतर पाणी आवर्तन सोडण्याची मागणी केल्यामुळे कार्यकारी अभियंता शिर्के यांच्या आदेशानुसार यांत्रिक विभागाकडून कालवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती उपअभियंता प्रशांत वनगुजरे यांनी दिली.
पाणी चोरीला आळा घाला
कोल्ही धरणातून पाणी आवर्तन सोडण्यासाठी तयार केलेल्या १३ किमी कालव्याच्या दुरुस्तीचे थातूरमातूर काम संबंधित विभागाने दोन वेळा निकृष्ट दर्जाचे करून निधी हडप केल्याचा आरोप कैलास पवार यांनी केला.
धरणाचे पाणी आरक्षित
२३ डिसेंबर रोजी २०१६-१७ या वर्षासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील १ मोठे, १६ मध्यम व ९० लघु प्रकल्पांतून बिगर सिंचन पाणी वापरासाठी पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यासाठी पालकमंत्री कदम यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोल्ही धरणातील ४० टक्के पाणीसाठा शिऊर, खंडाळा, कोल्ही या तीन गावांना पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला.