आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीदर्शन नेहमीच होत असते - रावसाहेब दानवे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड  - लक्ष्मी दर्शनावरून अडचणीत आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी, लक्ष्मी दर्शन नेहमीच होत असते, असे सांगून एक प्रकारे आपल्या यापूर्वीच्या वक्तव्याचे समर्थनच केले, असे म्हणावे लागेल. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

लक्ष्मी दर्शनाच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांशी आपले पटत नाही का, या प्रश्नावर ते म्हणाले की काहीही वावड्या उठतात, यामध्ये मीडिया बिबा घालतो, असे सांगून ते प्रसारमाध्यमांवरही घसरले. ते म्हणाले, आमच्यामध्ये काहीही मतभेद नाहीत. सर्वकाही आलबेल आहे.   शिवसेनेबरोबर युती व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र, युतीचा निर्णय हा जिल्हा पातळीवर घेतला जाईल. पुणे जिल्ह्यात मोक्काच्या आरोपीला गिरीश बापट यांनी भाजपत प्रवेश दिला. यावरून सर्वच स्तरांवरून टीका होत आहे. याबाबतीत माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे खासदार दानवे यांनी सांगितले.  

नगरपालिका निवडणुकांत चांगले यश मिळाले, आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही भाजपला चांगले यश मिळेल, असा दावाही खासदार दानवे यांनी केला. या वेळी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड, संतुक हंबर्डे, ओमप्रकाश पोकर्णा आदी उपस्थित होते.
 
जि.प., पं.स.मध्येही भाजपच नंबर वन
परभणी - राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजप नंबर एकचा पक्ष ठरला असून याच धर्तीवर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकांच्या निवडणुकीत पक्ष एक नंबरच ठरेल, यासाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे, अशी माहिती देतानाच पालिकांच्या निवडणुकीत मराठवाड्यात अपेक्षित यश मिळाले नसल्याची खंतही भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी (दि.१०) येथे व्यक्त केली.   जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) अभय चाटे यांच्या निवासस्थानी खा.दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.