आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंदोलनाच्या धसक्यामुळे महसूलमंत्र्यांनी दोन वेळा बदलला मार्ग, तरीही दाखवले काळे झेंडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- लातूरहून उस्मानाबादकडे येणाऱ्या नियोजित मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याच्या माहितीवरून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऐनवेळी मार्गात बदल करून उस्मानाबादेत येण्याचे नियोजन केले. मात्र, त्यांनी बदललेल्या दोन्ही मार्गांवर राष्ट्रवादी काँग्रेसने टीम उभी केली आणि महसूलमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. अगदी पहाटे पाच वाजेपासून पावणेआठपर्यंत मंत्र्यांचा दाैरा आणि राष्ट्रवादीच्या आंदोलनाची दिशा बदलत होती. यादरम्यान, महसूलमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधून ‘आम्ही खड्डे तर बुजवतोय, तरीही आंदोलन कशासाठी’, असा सवाल विचारला. त्यावर राणा पाटील यांनी अांदोलन शेतकरी प्रश्नावर असल्याची माहिती दिली आणि त्यानंतर उभयतांमध्ये सर्किट हाऊसवर चर्चा झाली.  


ऑनलाइन प्रक्रियेमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रावर माल विकता येत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेकडो टनांचे उत्पादन झाले असले तरी खरेदी मात्र काही क्विंटलमध्ये झाली आहे. शेतकऱ्यांची अडचण शासनाने सोडवावी, तातडीने खरेदी करावी, अन्यथा मंत्र्यांना जिल्ह्यात येऊ दिले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा गुरुवारी (दि. २३) उस्मानाबाद दौरा ठरला होता. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील  यांना जिल्ह्यात येऊ न  देण्यासाठी राष्ट्रवादीने आंदोलन केले.

 

चुकीची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारवाईला तयार राहावे : पाटील 
 लातूर | चांगले काम केले तर अधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळेल पण चुकीची कामे केली तर मात्र अधिकाऱ्यांनी कारवाईला तयार राहावे, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. पाटील यांनी लातूरच्या विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.   चंद्रकांत पाटील यांनी प्रारंभी लातूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यावर असमाधान व्यक्त करून पाटील यांनी या कामाची गती वाढवण्याची सूचना पाटील यांनी केली. 

 

आंदोलन बाकी आहे, हा तर निषेध : राष्ट्रवादी काँग्रेस  
जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असताना त्यांना मदत करण्याऐवजी त्रास देणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाबंदी जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत देऊनही सरकारने दखल न घेतल्याने गुरुवारी भल्या पहाटे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. हा तर केवळ निषेध आहे, आंदोलन अजून बाकी आहे, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...