आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांत ज्यांनी डल्ला मारला तेच आज करताहेत हल्लाबोल; राष्ट्रवादीच्या आंदोलनाची खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी- पंधरा वर्षांत ज्यांनी डल्ला मारला आता ते हल्लाबोल करत आहेत. आमच्याकडेही भरपूर मालमसाला आहे. तो जर बाहेर काढला तर त्यांना हल्ला करता येणार नाही. आमचे सरकार एक एक पैशाचा वापर शेतकरी व जनतेसाठी करत आहे. हल्लाबोलचा आम्ही डल्लामार करू, अशी  टीका करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी वडवणी येथील सरपंच मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची खिल्ली उडवली.    


वडवणी येथील बाजारतळावर आयोजित सभामंडपात सरपंच मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार विनायक मेटे, आर. टी. देशमुख, भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, संगीता ठोंबरे, माजी आमदार केशव आंधळे, रमेश पोकळे, नगराध्यक्ष मंगल मुंडे, रमेश आडसकर, नगराध्यक्ष  सहाल चाऊस, स्वरूपसिंह हजारी, बाबूराव पोटभरे, माजी आमदार बदामराव पंडित आदी उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,  आघाडी सरकारने जो कर्जमाफीचा निर्णय घेतला त्यामध्ये मुंबईतील शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली होती. मुंबईत एवढे पात्र शेतकरी आहेत का, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.   

 

२२ हजार गावे दुष्काळमुक्त करू    
कृष्णेच्या पाण्याचा एकही थेंब मराठवाड्याला मिळत नव्हता. हे पाणी कृष्णा खोऱ्यात आटायचे. आम्ही सात टीएमसी पाणी आणले. जलयुक्त शिवार योजनेतून महाराष्ट्राची क्रांती झाली. त्यामुळे राज्यात एक लाख टीसीएम पाणीसाठा झाला. ५१ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली आली. यापुढे महाराष्ट्रातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त केली असून यापुढे अाम्ही २२००  हजार गावे दुष्काळ मुक्त करू, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.  

 

 

शाळेत ई-लायब्ररी    
डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे ग्रामीण भागातील शाळा या शहरातील शाळेप्रमाणे झाल्या आहेत. राज्यातील ६३ हजार शाळा डिजिटल झाल्या असून पूर्वी १८ क्रमांकावर असलेला महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भविष्यात तो पहिल्या क्रमांकावर आणायचा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढले आहेत. भविष्यात आम्ही शाळांसाठी ई-लायब्ररी उपलब्ध करून देणार आहोत. यामुळे विद्यार्थ्यांना जगातील कुठेही पुस्तक वाचता येणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.  

 

 

भविष्यात १२ लाख घरे बांधायची आहेत  
स्वच्छ भारत अभियानातून महाराष्ट्रात ८३ टक्के शौचालये बांधली असून येत्या जूनपर्यंत शंभर टक्के शौचालय बांधायची असून महाराष्ट्र पाणंदमुक्त करायचा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून आम्ही महाराष्ट्रात घरे बांधण्याचे काम करत आहोत. २०१९ पर्यंत महाराष्ट्राला बेघरमुक्त करायचे आहे. सध्या साडेतीन लाख घराचे काम सुरू असून भविष्यात १२ लाख घरे बांधायची आहेत. महाराष्ट्रात एक हजार मॉडेल गावे उभे करणार आहोत. महाराष्ट्राला आम्ही उद्याेगात पुढे आणले असून ५० टक्के इतर राज्यांत, एकट्या राज्यात ५० टक्के गुंतवणूक वाढली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.   

बातम्या आणखी आहेत...