परभणी - परभणीकर सध्या महाबळेश्वरच्या वातावरणात असल्याचा अनुभव घेत आहेत. गारठून टाकणाऱ्या थंडीने जनजीवन विस्कळीत झाले असून गुरुवारी (दि. १२) सकाळी या वर्षातील सर्वात कमी म्हणजेच ५ अंश सेल्सियस इतके नीचांकी तापमान नोंदले गेले. दुपारच्या तापमानातही घट होऊन ते २४.५ अंश सेल्सियसवर राहिल्याने दुपारीही थंड वारे वाहू लागले. याचा परिणाम शुक्रवारी (दि. १३) तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असल्याने थंडीची लाट अधिकच तीव्र झाली आहे.
दिवाळीपासून जाणवणारी गुलाबी थंडी यंदा डिसेंबरपासून अधिकच वाढत गेली. जानेवारीची सुरुवात तर कडाक्याच्या थंडीने झाल्याने नववर्षाचे स्वागत जोरदार झाले. बोचरी थंडी कडाक्यात रूपांतरित झाली. मागील चार वर्षांच्या तुलनेत तापमानाचा पारा अधिकच घसरत चालला आहे. त्याला कारण यावर्षी झालेला मुबलक पाऊस हेही आहे. जिल्ह्याने यावर्षी वार्षिक सरासरी ओलांडल्याने पाणवठ्यांत आजही भरपूर पाणी आहे. त्यात जायकवाडीच्या कालव्यांना पाणी असल्याने थंडीच्या प्रमाणात अधिकच वाढ झाली. यंदा ११६ टक्के सरासरी पावसाचे प्रमाण होते. त्यामुळे जानेवारीच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेली थंडी अधिकच वाढत चालली असून तापमानाचा पारा नीचांकी नोंदी नोंदवू लागला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान केंद्रात बुधवारी (दि. ११) दुपारी २५.६ अंश सेल्सियसची नोंद झाली. दिवसाचे कमाल तापमानही घसरू लागल्याचा परिणाम गुरुवारच्या सकाळच्या तापमानावर होऊन त्यात घट झाल्याने ५ अंश सेल्सियसची नोंद झाली. यामुळे शुक्रवारच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता कृषी हवामान केंद्राने वर्तवली आहे.
उत्तर भारतातील
हिमवृष्टीचा परिणाम... गेल्या काही वर्षांत ज्या ज्या वेळी उत्तर भारतात थंडीची लाट आल्यानंतर हिमवृष्टी झाली त्या त्या वेळी त्याचा परिणाम मराठवाड्यावरदेखील होत असतो. सध्याही उत्तर भारतात हिमवृष्टी होत असल्याने महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. ही लाट आणखी काही दिवस निश्चितच असण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान केंद्राचे वेधशाळा निरीक्षक ए. आर. शेख यांनी व्यक्त केली.
गव्हाच्या उगवणीवर परिणाम... सध्या गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. परंतु थंडीच्या लाटेमुळे तापमान घसरत असल्याचा परिणाम गव्हाच्या उगवणीवर होण्याची शक्यता आहे. उगवण शक्ती कमी होते. उगवणीसाठी साधारणत: १० अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची आवश्यकता असते. १० ते १५ दिवसांपूर्वी पेरणी झालेल्या गव्हावर या घसरत्या तापमानाचा परिणाम होणार आहे. या गव्हासाठी हे वातावरण पोषकच आहे. हरभऱ्यासाठीही हे वातावरण चांगलेच आहे. फळबागांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. त्यात द्राक्ष, केळी आदी फळांसाठी उष्ण तापमानाची आवश्यकता असते.
२.८ अंश सेल्सियसचा विक्रम
परभणी जिल्ह्याच्या इतिहासात मागील ५० वर्षांत दोन वेळा तापमानाच्या घसरत्या पाऱ्याने विक्रम नोंदवलेला आहे. दोन्ही वेळा थंडीच्या लाटेने कहर केला होता. ती थंडी गारठून टाकणारी होती. २.८ अंश सेल्सियस अशी ती विक्रम नोंद राहिली. त्याआधी व नंतरही यापेक्षा काटा खाली गेलेला नाही. १७ जानेवारी १९६८ व १७ जानेवारी २००३ अशा त्या तारखा होत.
जनजीवन विस्कळीत...
आठ दिवसांपासून थंडीची लाट कायम असल्याचा परिणाम जनजीवनावर झाला असून सकाळच्या सत्रात शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रमाणही कमी राहू लागले आहे. बाजारपेठही सकाळी ११ नंतरच सुरू होऊ लागली असून सायंकाळी लवकर बंद होऊ लागली आहे. दरम्यान, मकरसंक्रांतीच्या खरेदीसाठी गुरुवारी दुपारी बाजारपेठेत तोबा गर्दी झाली होती.
मागील सात वर्षांतील नोंदी
७ जानेवारी २०११ - ३.९ अंश सेल्सियस
१५ जानेवारी २०१२ - ५ अंश सेल्सियस
१४ डिसेंबर २०१३ - ६.५ अंश सेल्सियस
१८ डिसेंबर २०१३ - ३.६ अंश सेल्सियस
१० जानेवारी २०१५ - ४.४ अंश सेल्सियस