आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर मार्गाच्या कामाचे पितळ उघडे, वापरापूर्वीच पुलाची दुरवस्था! प्रवाशांचा जीव धोक्यात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महामार्ग चौपदरीकरणादरम्यान बांधण्यात आलेल्या पुलाचा स्लॅब उखडून सळया बाहेर आल्या आहेत. प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. - Divya Marathi
महामार्ग चौपदरीकरणादरम्यान बांधण्यात आलेल्या पुलाचा स्लॅब उखडून सळया बाहेर आल्या आहेत. प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
उमरगा- उमरगा तालुक्याला तसेच शहरासाठी वरदान ठरणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू असून, कामांचा दर्जाही खराब असल्याने कंत्राटदाराचे पितळ उघडे पडत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत आहेत की काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. चौपदरीकरणाचे काम तर दूरच, पण सद्य:स्थितीत चालू असलेल्या रस्ता दुरुस्तीला होणाऱ्या विलंबामुळे नाहक अनेकांना अपघातात जीव गमवावा लागतो आहे.   

सोलापूरहून हैदराबाद जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम तीन वर्षांपासून हळू सुरू आहे. हे काम मुंबईच्या एका कंपनीने घेतले असून काम घेतल्यापासून या कंपनीने काम कधी सुरळीत केलेच नाही. लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी कामांबाबत अनेकदा तक्रारी केल्या, मात्र अधिकारी व कंपनीने आपला पवित्रा काही बदलला नाही. निकृष्ट व दर्जाहीन काम तेही संथगतीने सुरू आहे. नवीन करण्यात आलेल्या रस्त्यावर शेकडो खड्डे पडले असून खड्डे बुजविण्याची तसदीसुद्धा ही कंपनी घेत नाही. संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला, गावाजवळ भुयारी मार्ग अथवा उड्डाण पूल व्हावे यासाठी काही ठिकाणी काम बंद आंदोलन करण्यात आले. मात्र अशा शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रकारही या कंपनीचे कर्मचारी करत असल्याच्या तक्रारीही घडत आहेत. सर्व नियम धाब्यावर बसवून कसे तरी करून काम रेटून नेणे एवढाच एक ठेका कंपनीने धरला आहे. नळदुर्ग ते कर्नाटक राज्य सीमेचे काम तर अतिशय थंड चालू आहे.

वापरापूर्वीच पुलाची दुरवस्था!  
महामार्गावर अनेक ठिकाणी नवीन पुलाचे काम झाले आहे. दोन ठिकाणी पूल खचला तर बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी सगळ्या उघड्या पडल्याने वाहनधारकाना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामा दरम्यान पर्यायी मार्गासाठी काही ठिकाणी जुन्या पुलाची तात्पुरती डागडुजी करून वाहतुकीसाठी खुला केला असलातरी त्याच्या बाजूचा भराव ढासाळल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. चौपदरी-करणाच्या नव्याने झालेल्या रस्त्याचीही दयनीय अवस्था झाल्याने चौपदरीकरणाचे काम किती दर्जाहीन होत आहे याची जाणीव होते.

निकृष्ट काम   
महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान जुने काम उखडून काढून त्या खड्ड्यात मुरुम, खडी भरणे आवश्यक असताना जुन्या उखडून काढलेल्या डांबरमिश्रित खडकानेच रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. रस्ता बनविण्यासाठी मातीमिश्रित मुरमाचा वापर केला जात आहे. महामार्गाचे काम वेगाने होणे अपेक्षित असताना संथगतीने सुरू असल्याने अपघातात वाढ झाली आहे. जुना रस्ता पूर्ण उखडून खोलपर्यंत जाऊन मुरुम लागत नाही तोपर्यंत खोद काम व्हायला हवे होते, पण तसे न होता जुन्या रस्त्यावरच काम करताना दिसत आहेत. नवीन डांबरीकरणाचे कामही दर्जाहीन झाले असून नवीन रस्त्यावर शेकडो खड्डे पडले आहेत.

प्रतिनिधींची डोळेझाक
खासदार, दोन आमदार, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सभापती, सदस्य  आदी लोकप्रतिनिधी राहतात. याच मार्गावरून ये-जा करतात. मात्र तेही डोळे झाक करत आहेत. संबंधित ठेकेदार, भारतीय प्राधिकरण विभागाचे अधिकारी यांना धारेवर धरून काम पूर्ण करायला हवे.

साइड पट्ट्या खचल्या!
रस्ता चौपदरीकरण व जुन्या महामार्गावर पडलेली मोठमोठाले खड्डे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंची साइडपट्टी एक ते दीड फूट खोल खचल्याने खड्डे चुकवण्याच्या नादात दुचाकीचालक अपघात होऊन जखमी झाले तर कायमचे जायबंदी होत आहेत.
बातम्या आणखी आहेत...