आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्यांगना नाचवण्यासाठी परवानगी नाकारली; ईटची यात्रा वादात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ शुक्रवारी ईटमध्ये बंद पाळण्यात आला. यादरम्यान पोलिसांनी पथसंचलन केले. - Divya Marathi
पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ शुक्रवारी ईटमध्ये बंद पाळण्यात आला. यादरम्यान पोलिसांनी पथसंचलन केले.
ईट - भूम तालुक्यातील ईट येथील ग्रामदैवत श्री खोपेश्वर यात्रा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शुक्रवारपासून प्रारंभ होत असलेल्या या यात्रेला पोलिस प्रशासनाच्या आणि गावकऱ्यांच्या भूमिकेमुळे गालबोट लागले. अनेक वर्षांपासून यात्रेत करमणूक म्हणून नाचवण्यात येणाऱ्या नृत्यांगना नाचवण्यासाठी परवानगी नाकारल्याने निषेध म्हणून ग्रामस्थांकडून तसेच व्यापाऱ्यांकडून ऐन यात्रेदिवशीच बाजारपेठ व गाव बंद ठेवण्यात आले. रात्री खोपेश्वरांची पालखीही न उचलण्याचा गावकऱ्यांनी पवित्रा घेतल्याने तणाव वाढला होता.
 
तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या ईटची चैत्र यात्रा कामदा एकदशीला मोठ्या उत्साहात सुरू होते. मात्र या वेळी यात्रेच्या मोठ्या उत्साहाला गालबोट लागले आहे. यात्रेत गेल्या अनेक वर्षांपासून नृत्यांगना नाचवल्या जातात. नृत्यांगना नाचवण्याची जुनीच परंपरा असल्याचे गावकरी सांगतात. मात्र नृत्यांगना नाचवण्यासाठी पोलिस प्रशासनाने गेल्या दोन वर्षांपासून बंदी घातली आहे. या वर्षी पुन्हा नृत्यांगना नाचवण्याची विनंती ईट ग्रामस्थांकडून पोलिस प्रशासनाला करण्यात आली. मात्र त्यासाठी प्रशासनाकडून विरोध करण्यात आला. तसेच ग्रामस्थांकडून व यात्रा कमिटीकडून, सर्वपक्षीय नेत्यांकडूनही विनंती करण्यात अाली. वेळेच्या अात नृत्य थांबवू, कोणताही गैरप्रकार होऊ दिला जाणार नाही, अशी ग्रामस्थंाच्या वतीने पोलिसांना हमीही देण्यात अाली होती. गुढीपाडव्याच्या दिवसापासून पोलिस प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू होती. मात्र पोलिस प्रशासनाने ही विनंती अमान्य करीत परवानगी नाकारली. यात्रेदिवशी उत्सव समिती, सर्वपक्षीय नेते, ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी पोलिस उपअधीक्षक धुमाळ यांची भेट घेऊन मागणी केली. मात्र पोलिस काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने समितीसह सर्वपक्षीय नेत्यांनी पोलिसांचा निषेध करीत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याला व्यापाऱ्यांनीही बाजारपेठ बंद ठेवून साथ दिली. शुक्रवारी सकाळपासूनच ईटची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक चौकात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र दहशत पसरली आहे. दरम्यान, सकाळी पोलिसांनी गावातून पथसंचलनही केले. दिवसभर पोलिस अधिकारी गावकऱ्यांची समजूत घालत होते. मात्र, गावकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. गावकऱ्यांनी खोपेश्वरांची पालखी न उचलण्याचा निर्णय घेतल्याने पोलिस प्रशासनही पेचात सापडले आहे.  
 
पोलिसांना सहकार्य करावे  
- मागणीला विरोध केला, त्यामुळे ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे परवानगी नाकारण्यात आली आहे. वेगळ्या पद्धतीने समाजप्रबोधन करावे. पोलिसांना सहकार्य करावे. 
-किशोर काळे, पोलिस उपनिरीक्षक, वाशी,  
 
पोलिसांचा दबाव वाढतोय  
- पारंपरिक पद्धतीने यात्रा पार पडत असताना दोन वर्षांपासून पोलिसांनी दबाव वाढवून उत्सव बंद पाडण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिस संचलन करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे.   
-विद्याताई अहिरे, सरपंच, ईट
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...