आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चलन तुटवडा : महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांना कोंडले, अर्ध्या तासानंतर सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईट (ता. भूम)- नोटाबंदीच्या निर्णयापासून गैरसोयीचा सामना करणाऱ्या ईट व परिसरातील नागरिकांचा मंगळवारी(दि.३) संयम सुटला. महाराष्ट्र बँकेच्या शाखेत चलन नसल्याने संतापलेल्या ग्राहकांनी बँकेच्या शाखेला टाळे ठोकून कर्मचाऱ्यांना मध्येच कोंडले. अर्ध्या तासानंतर कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, बँकेचे कर्मचारी ठरावीक व्यापाऱ्यांना रक्कम देतात, शेतकऱ्यांना मात्र दररोज परत पाठवले जाते, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 
  
ईटच्या महाराष्ट्र बँकेत गेल्या ५४ दिवसांपासून चलन तुटवडा आहे. मागणीच्या तुलनेत रक्कमच मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. सकाळी आठ वाजेपासून रांगेत थंाबूनही ग्राहकांना चलन संपल्यानंतर रिकाम्या हाताने परतावे लागते. काही दिवस तर बँकेत चलन पुरवठाच होत नाही. एटीएम सेंटर नोटाबंदीपासून एकही दिवस सुरू झालेले नाही. विशेषत: शेतकरी वर्गाला चलन तुटवड्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत अाहे. ग्रामीण भागातील अर्थकारण पूर्णत: कोलमडून गेले आहे. मंगळवारी सकाळी बँक उघडल्यानंतर असलेली रक्कम वाटप करण्यात आली. मात्र १५० ग्राहकांना रक्कम न मिळाल्याने त्यंाचा राग अनावर झाला. त्यांनी शाखाधिकाऱ्याला घेराव घालून रकमेची मागणी केली. त्यानंतर बँकेच्या शटरला बाहेरून कुलूप लावण्यात आले. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ कर्मचारी आतच होते. या वेळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी करून कुलूप उघडायला लावले. मात्र, त्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. यामुळे ग्राहकांत प्रचंड संताप खदखदत आहे.

मागणी करूनही रक्कम मिळेना 
अनेक दिवसांपासून वरिष्ठांकडे मोठ्या रकमेची मागणी करण्यात येत आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवरून कमी स्वरूपात रक्कम दिली जाते. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.   
-ए. चांदणे, शाखाधिकारी.  
बातम्या आणखी आहेत...