आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आष्टीत दुपारी चारपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँक बंद, शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयातच ठिय्या आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी - मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांनी आष्टी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर  रांगा लावल्या होत्या, परंतु  दुपारपर्यंत येथील  जिल्हा बँकेच्या शाखेला टाळेच होते.  बँकेच्या या कारभाराच्या  विरोधात शेतकऱ्यांनी तहसीलदारांसमोरच संताप व्यक्त करत येथील तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शेवटी लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.  
 
राज्य सरकारने पीक विमा भरण्याची मुदत ५ ऑगस्ट २०१७ पर्यंत वाढवली असून मंगळवारी सकाळपासूनच तालुक्यातील  शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर रांगा  लावू लागले. यात महिला देखील सहभागी होत्या. दुपार झाली तरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा उघडत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी बँकेच्या अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होत नसल्याने अखेर संतप्त  शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय  गाठले. तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्यासमोरच व्यथा मांडली.  आज आम्ही मोठ्या  आशेने बँकेच्या दारात पुन्हा रांगेत उभे ठाकलो, पण बँकेला दुपारी चार वाजेपर्यंत टाळे असल्याने आमचा वाली कोण आहे, असा सवाल केला. दरम्यान, तहसीलदार रामेश्वर गोरे व युवा नेते जयदत्त धस यांनी  शेतकऱ्यांची समजूत काढत बँक सुरू करण्यासाठी सूचना दिल्या. 
 
दुपारपर्यंत सिस्टिम हँग  
रात्री उशिरापर्यंत विमा भरणे सुरू होते. या शाखेत जवळपास ५ हजार अर्ज स्वीकारले आहेत. ३१ तारखेला अतिरिक्त भार असल्याने आमची सिस्टम हँग झाली होती. दुपारी साडेचार वाजता ही सिस्टम दुरुस्त झाली असून सायंकाळी साडेपाच वाजता विमा भरणे सुरू झाले आहे. 
- आदित्य सारडा, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक
बातम्या आणखी आहेत...