आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात बंडखाेरांनी वाढवली ‘राष्ट्रवादी’ची डाेकेदुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर हाेऊन तीन दिवस उलटले. अद्याप बीड जिल्ह्यातील युती व आघाडीबाबत निर्णय झालेला नाही. सध्या या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता अाहे. मात्र, बीड तालुक्यात क्षीरसागर व गेवराई तालुक्यात पंडित या पक्षांतील दाेन प्रमुख घराण्यांत बंडखाेरी उफाळून अाल्यामुळे राष्ट्रवादीला माेठा फटका बसण्याची चिन्हे अाहेत. या परिस्थितीचा फायदा उठविण्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यशस्वी ठरतात का, हे पाहणे अाैत्सुकत्याचे ठरेल. दरम्यान, या निवडणुकीतही पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या भाऊ- बहिणीच्या नेतृत्वाचा कस लागणार अाहे.

मागील टर्ममध्ये सुरुवातीच्या अडीच वर्षांत झेडपीवर राष्ट्रवादीची सत्ता राहिली. मात्र,  दुसऱ्या टर्ममध्ये युती व आघाडीचे २९ असे समान संख्याबळ झाल्याने सोडत पद्धतीत पुन्हा राष्ट्रवादीचेच नशीब फळफळले अाणि राष्ट्रवादीचे अामदार अमरसिंह पंडित यांचे बंधू विजयसिंह (स्वाभिमानी अाघाडी) यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात अाले. यंदाच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीसमाेरील अडचणी वाढल्या आहेत.  विद्यमान  सभापती पुतणे संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीमधील जिल्हाध्यक्ष व आमदार असलेल्या दोन्ही काकांच्या नेतृत्वाला अाव्हान देत काकू- नाना अाघाडी स्थापन केली. बीडच्या नगरपालिका निवडणुकीतही संदीप यांनी काकांना जेरीस अाणले हाेते. तर गेवराईचे माजी आमदार बदामराव पंडित हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेच्या वाटेवर अाहेत. यामुळे अडचणीत अालेल्या राष्ट्रवादीसमाेर काॅंग्रेसशी अाघाडी करून ताकद वाढविण्याचा पर्याय अाहे. मात्र, अद्याप त्याबाबत अधिकृत बाेलणी झालेली नाही. जर सन्मानाने आघाडीचा प्रस्ताव आला तर एकत्र लढू, अशी भूमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी घेतली आहे. विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा केवळ परळी- अंबाजाेगाई तालुक्यात प्रभाव दिसताे, त्यामुळे जिल्ह्यात दुभंगलेल्या ‘राष्ट्रवादी’ला सावरण्याचे त्यांच्यासमाेरही अाव्हान असेल.  

दुसरीकडे, बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नरत अाहे. ज्येष्ठ नेते गाेपीनाथ मुंडे यांनी यापूर्वी एकदा ‘जादूची कांडी’ फिरवून अापले ज्येष्ठ बंधू दिवंगत पंडितअण्णा मुंडे यांना अध्यक्षपदी विराजमान केले हाेते. मात्र, गेल्या वेळी दुसऱ्या टर्ममध्ये समसमान पक्षीय बलाबल असूनही भाजपला राष्ट्रवादीच्या ताब्यातून जिल्हा परिषद हिसकावून घेता अाली नाही. यंदा  पालकमंत्री पंकजा मुंडेंसमाेर सत्ता मिळवण्याचे अाव्हान असेल. जिल्ह्यात फारशी ताकद नसली तरी शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत अाहे. माजी अामदार बदामराव पंडितांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला गेवराई तालुक्यापुरते का हाेईना बळ मिळू शकते. दरम्यान, पालकमंत्री मुंडे अनूकूल असतील तरच बीड जिल्ह्यात भाजप- शिवसेना युतीचा निर्णय हाेऊ शकताे, हे तितकेच खरे. 
 
मेटे- जानकरांना हवाय वाटा  
अामदार विनायक मेटे यांचा शिवसंग्राम अाणि मंत्री महादेव जानकर यांचा ‘रासप’ या महायुतीतील दाेन्ही पक्षांनी भाजपच्या काेट्यातून जागा हव्या अाहेत. पंकजा मुंडे यांच्याशी फारसे सख्य नसल्यामुळे मेटेंनी थेट मुख्यमंत्र्यांना  पत्र देऊन जागांची मागणी केली अाहे, तर रासपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २ गट व ४ गण द्यावेत, अशी मागणी केली अाहे, अन्यथा स्वबळावर लढण्याचा इशाराही दिला अाहे. बीड व माजलगाव नगरपालिका निवडणुकीत एकूण १० जागा मिळविणाऱ्या एमअायएमने अद्याप जिल्हा परिषदेबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही.