आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौरंगी लढतीत मतविभागणीचा फटका ठरणार निर्णायक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना तसेच भारतीय जनता पक्षासह छोट्या पक्षांचे उमेदवार जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरल्याने मतविभागणीच्या फटका प्रमुख राजकीय पक्षांना बसणार आहे. जातीपातीची समीकरणे जुळवताना व्होट बँक ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना मोठी चुरशीची लढत द्यावी लागणार आहे. या वेळी प्रथमच शिवसेना व भाजप सर्वच जागांवर निवडणूक लढवत असल्याने पूर्वीच्या युतीतील हे दोन्ही घटक पक्ष मतविभागणी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील.

मागील वेळी बहुमताच्या काठावर पोहोचलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था या वेळी फारशी चांगली नाही. गटबाजीने पोखरलेल्या या पक्षात स्थानिक पातळीवरील नेता आपापल्या प्रभाव क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार असल्याने काही मतदारसंघांत चित्र आलबेल राहण्याची शक्यता आहे. जिंतुरात आ. विजय भांबळे, पाथरीत जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, तर गंगाखेडमध्ये आ. डॉ. मधुसूदन केंद्रे यांची यानिमित्ताने सत्त्वपरीक्षा ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. परभणीसह अन्य तालुक्यांत राष्ट्रवादीला नेतृत्वाची उणीव भासण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीला नेतृत्वाचा अभाव नसल्याचे दाखवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. ग्रामीण भागावरील आपली पकड अधिक मजबूत असल्याचे दाखवून देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्यासाठीही ही कसोटी ठरणार आहे. सद्य:स्थितीला काँग्रेसचा एकही आमदार नसल्याने त्या-त्या प्रभावक्षेत्रात प्रयत्न करताना राष्ट्रवादीसह शिवसेनेला सामोरे जावे लागणार आहे. जिंतुरात माजी आ. रामप्रसाद बोर्डीकरांना या निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद दाखवून देण्यासाठी आ. भांबळेंना मोठा शह द्यावा लागणार आहे. जिंतुरात शिवसेना व भाजपचे अस्तित्वच नसल्याने येथे काँग्रेस-राष्ट्रवादीतच काट्याची लढत अटळ आहे. पाथरीत आ. बाबाजानींच्या वर्चस्वाला रोखण्यासाठी वरपुडकरांसमोर आव्हान आहे. गंगाखेडमध्येही काँग्रेसचे फारसे अस्तित्व नाही. शिवसेनेने या वेळी चार जागा वगळता ५० जागांवर उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. खा. संजय जाधव, आ. डॉ. राहुल पाटील व आ. मोहन फड या तिघांनी आपापल्या समर्थकांना रिंगणात आणले असले तरी यातून गटबाजी प्रकर्षाने समोर आलेली आहे. त्यामुळे परभणी व पाथरी या दोन विधानसभा मतदारसंघांची मदार दोन्ही आमदारांवर असल्याने उर्वरित गंगाखेड व जिंतूरवर खा. जाधव यांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
 
भाजपची कसरत
केवळ दोनच सदस्य संख्येवर असलेल्या भाजपला या वेळी संपूर्ण जागांवर उमेदवार तयार करतानाही कसरत करावी लागली. ऐनवेळी इतर पक्षांतून आलेल्यांना उमेदवारी देण्याची वेळ आली. स्थानिक नेतृत्वाचा अभाव असल्याने त्या-त्या मतदारसंघात उमेदवारांनाच आपली ताकद पणाला लावावी लागणार आहे. अशाही स्थितीत भाजपने काही ठिकाणी तगडे उमेदवार दिल्याने चुरस निर्माण होणार आहे. मात्र, मत विभाजनाच्या फटक्याने भाजपचे उमेदवार कितपत स्पर्धेत टिकतील, हा मोठा प्रश्न आहे.
 
केवळ दोनच सदस्य संख्येवर असलेल्या भाजपला या वेळी संपूर्ण जागांवर उमेदवार तयार करतानाही कसरत करावी लागली. ऐनवेळी इतर पक्षांतून आलेल्यांना उमेदवारी देण्याची वेळ आली. स्थानिक नेतृत्वाचा अभाव असल्याने त्या-त्या मतदारसंघात उमेदवारांनाच आपली ताकद पणाला लावावी लागणार आहे. अशाही स्थितीत भाजपने काही ठिकाणी तगडे उमेदवार दिल्याने चुरस निर्माण होणार आहे. मात्र, मत विभाजनाच्या फटक्याने भाजपचे उमेदवार कितपत स्पर्धेत टिकतील, हा मोठा प्रश्न आहे.
बातम्या आणखी आहेत...