आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपाताचे रॅकेट: तीन डॉक्टरसह सात अटकेत, अाराेग्यमंत्री अाज करणार निवेदन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली जिल्ह्यातील गर्भपात रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेल्या डाॅ. बाबासाहेब खिद्रापुरेला मिरजच्या पाेलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले. - Divya Marathi
सांगली जिल्ह्यातील गर्भपात रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेल्या डाॅ. बाबासाहेब खिद्रापुरेला मिरजच्या पाेलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले.
सांगली - तब्बल २० अर्भकांचा मारेकरी ठरलेल्या म्हैसाळा (जि. सांगली) येथील डाॅ. बाबासाहेब खिद्रापुरेच्या अमानवी कृत्यात सहभाग असलेल्या बेळगावातील तीन डाॅक्टरांसह अन्य दाेघांना अटक करण्यात पाेलिसांना यश अाले अाहे.   दरम्यान, राज्याचे अाराेग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत व राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी बुधवारी  म्हैसाळा गावात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाईचा अाढावा घेतला. 
 
एका महिलेच्या मृत्यूनंतर रविवारी डाॅ. खिद्रापुरेचे गर्भपात रॅकेट उघडकीस अाले. त्याच्या रुग्णालय परिसरातून सुमारे २० अर्भकांचे मृतदेह पाेलिसांच्या हाती लागले अाहेत. याप्रकरणी डाॅ. खिद्रापुरेला साेमवारी बेळगावातून अटक करण्यात अाली. त्यापाठाेपाठ विजयापूर येथील डॉ. रमेश देवगीकर आणि अाैषधांचा पुरवठादार सुनील खेडकर, कर्नाटकातील कागवाड परिसरातून डॉ. श्रीहरी घोडके, खिद्रापुरे याच्या दवाखान्यात काम करणारी नर्स कांचन रोझे यांच्यासह एकूण सात अाराेपींना अटक करण्यात अाली अाहे.  डॉ. देवगीकर याच्याकडील दाेन साेनाेग्राफी मशीनही जप्त करण्यात अाल्या अाहेत. याच साेनोग्राफी मशीनद्वारे तपासणी करून स्त्री जातीचे अर्भक असल्यास त्याचा खिद्रापुरेच्या रुग्णालयात गर्भपात केला जात असल्याचा संशय अाहे.  दरम्यान, बीएचएमएस असूनही खिद्रापुरे अॅलाेपॅथी अाैषधांचा सर्रास वापर करायचा. बेळगावातून अटक करण्यात अालेल्या डाॅक्टरांकडून खिद्रापुरेला गर्भपातासाठी अाैषधांचा पुरवठा केला जात असल्याची माहिती अाहे.   
 
अाराेग्यमंत्री अाज करणार निवेदन  
अाराेग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत गुरुवारी या गर्भपात प्रकरणावर विधिमंडळात निवेदन करणार अाहेत. दरम्यान, २० अर्भकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात अाले अाहेत. त्यांचा अहवाल एक-दाेन दिवसांत येणे अपेक्षित अाहे. त्यानंतरच ही अर्भके स्त्री जातीची हाेती का, याचा उलगडा हाेणार असल्याची माहिती अाराेग्य विभागातील सूत्रांनी दिली.
 
डाॅक्टरला पाठीशी घालणाऱ्या अाराेग्य अधिकाऱ्यांवर कारवाईचे अादेश
महिला अायाेगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची माहिती
औरंगाबाद - ‘म्हैसाळा येथील खिद्रापुरेच्या रुग्णालयात स्त्री भ्रूणहत्या होत असल्याची तक्रार २०१६ मध्ये आली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. परंतु आरोग्य विभागाच्या पथकाने साधा अहवाल देत येथे असे काहीच घडत नसल्याचे म्हटले होते. दवाखान्याला भेट देऊन असा अहवाल देणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर  तातडीने कारवाई करावी’, असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले आहेत.   

‘बीएचएमएस  डॉक्टर असलेल्या खिद्रापुरेच्या दवाखान्यातील शस्त्रक्रियेची उपकरणे बघून मला धक्काच बसला. या रुग्णालयाची नोंदणीही नाही, तळघरात शस्त्रक्रियागार कसे काय असू शकते, असाही प्रश्न पडतो. त्यामुळे त्या डॉक्टरच्या विरोधात आणखी गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. २०१६ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाल्यानंतरही प्रशासनाने डॉक्टरच्या सोयीचा अहवाल दिला. ही गंभीर चूक आहे. मला जे काही आज दिसले ते तेव्हा पथकाला का दिसले नाही, असा प्रश्न असून संबंधितांवर तातडीने आणि कठोर कारवाईचे आदेश आयोगाने दिले आहेत,’ असे रहाटकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. 
 
तळघरात विनापरवाना अाॅपरेशन थिएटर; ड्राॅवरमध्येही सापडले मृत अर्भक
खिद्रापुरे याने रुग्णालयाच्या तळघरात ऑपरेशन थिएटर थाटले हाेते. साेनाेग्राफी व शस्त्रक्रियेचा त्याच्याकडे परवानाही नाही. कर्नाटक सीमाभागातील डाॅक्टरांमार्फत साेनाेग्राफी करून ताे या ठिकाणी गर्भपात करायचा. त्याच्या रुग्णालयातील तळघरात एक माेठी टाकी असून त्यातही काही अर्भके टाकल्याचा पाेलिसांना संशय अाहे. या अाॅपरेशन थिएटरची तपासणी करताना तिथे माेठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत हाेती. रुग्णालयातील एका ड्राॅवरमध्येही पाेलिसांना अर्भकाचा मृतदेह सापडला. हॉस्पिटलसमाेरील गटारीचे खाेदकाम करूनही तिथे अर्भकांच्या मृतदेहांची शाेधमाेहीम सुरू अाहे.  
 
तिसरीही मुलगीच असल्याने...  
- गर्भपात झाल्यानंतर स्वातीचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात अाला. स्वातीचा पती मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत हाेता. मात्र पाेलिसांनी वेळीच राेखल्यामुळे त्याला तसे करता अाले नाही.  आम्ही गेल्यावर योग्य ती कारवाई करून अंत्यसंस्कार करण्यात अाले. मृत स्वाती हिला दोन लहान मुली असून तिसरीही मुलगी आहे हे कळताच पतीने तिचा गर्भपात केला.
- सुहास जाधव, मृत स्वातीचा चुलता
 
दहा महिन्यांपूर्वीची तपासणी फेल
डाॅ. खिद्रापुरेच्या विराेधात काही महिन्यांपूर्वीच तक्रारी दाखल झाल्या हाेत्या. त्याची दखल घेऊन मे महिन्यात अाराेग्य अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची अचानक तपासणीही केली, मात्र संशयास्पद काहीच सापडले नाही. अाताही अाराेग्यमंत्र्यांनी पाच जणांची चाैकशी समिती नेमली अाहे, त्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यासह स्थानिक अधिकाऱ्यांचा समावेश अाहे. त्यांच्या हाती अाता तरी काही लागेल का, अशी शंका उपस्थित केली जात अाहे.
 
रजिस्टरमध्ये महिलांची नावे; नातलगांचीही हाेणार चाैकशी
पाेलिस अधिकारी व चाैकशी समितीने गेल्या दाेन दिवसांत रुग्णालयाची तपासणी केली  असता तिथे एक रजिस्टर सापडले. त्यात काही महिला रुग्णांची नावे अाहेत. त्यांच्या नातलगांना बाेलावून अधिक चाैकशी करणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ व डाॅक्टरवर कारवाईच्या मागणीसाठी मंगळवारी म्हैसाळा येथील व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली अाहे. 
 
गर्भवती महिलेच्या मृत्यूने फोडली डॉ. खिद्रापुरेच्या ‘पापा’ला वाचा
सांगलीपासून अवघ्या २५ ते ३० किलाेमीटरवर म्हैसाळा हे गाव. कर्नाटकच्या सीमाभागात गर्भवती महिलांची साेनाेग्राफी करून या गावातील खिद्रापुरेच्या दवाखान्यात त्यांचा गर्भपात करण्याचे रॅकेट गेल्या पाच-सात वर्षांपासून सक्रिय असल्याचा पाेलिसांना संशय अाहे. मणेराजुरी (ता. मिरज) येथील विवाहित महिला स्वाती प्रवीण जमदाडे हिच्या मृत्यूनंतर हा गाेरखधंदा उजेडात अाला. दाेन मुलींची अाई असलेली स्वाती तिसऱ्यांदा गर्भवती राहिली हाेती. मात्र गर्भलिंग तपासणीत तिला पुन्हा मुलगीच हाेणार असल्याची माहिती कळल्यामुळे पती प्रवीणने खिद्रापुरेच्या दवाखान्यात अाणून तिचा गर्भपात केला हाेता. मात्र या शस्त्रक्रियेदरम्यान तिचा मृत्यू झाला.
 
स्वातीच्या माहेरच्या लाेकांनी याबाबत फिर्याद दिल्यानंतर पाेलिसांनी अाधी प्रवीणला ताब्यात घेतले व चाैकशी केली असता हा सर्व प्रकार उजेडात अाला. पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दवाखाना सील केला, मात्र ताेपर्यंत खिद्रापुरे फरार झाला हाेता. प्रवीणने दाखवलेल्या जागेवर पाेलिसांनी खाेदकाम करून अर्भकाचा मृतदेह शाेधण्याचा प्रयत्न केला असता, त्या परिसरात एक-दाेन नव्हे तर तब्बल १९ अर्भकांचे मृतदेह सापडले अाणि सारेच चक्रावून गेले. तर साेमवारी तपासणीत रुग्णालयातील एका ड्राॅवरमध्ये २० वा मृतदेह सापडला.   दरम्यान, या सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल एक- दाेन दिवसांत येणार असून त्यानंतरच ते स्त्री अर्भक हाेते की नाही याचा उलगडा हाेणार अाहे. 
 
पत्नीही अायुर्वेदिक डाॅक्टर  
खिद्रापुरे याची पत्नी मनीषा ही अायुर्वेदिक डाॅक्टर असून ती दुसऱ्या ठिकाणी दवाखाना चालवते. खिद्रापुरेच्या या ‘पापा’त तिचा काही सहभाग हाेता का, याचीही पाेलिस सखाेल चाैकशी करत अाहेत. दरम्यान, बाॅम्बे नर्सिंग अॅक्ट,  मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट यांचा कुठलाही परवाना न घेता खिद्रापुरे साेनाेग्राफी मशीनचा वापर करत हाेता. त्यामुळे अाराेग्य विभागाच्या वतीने त्याला अाता नाेटीस बजावण्यात अाली अाहे. तसेच पीसीपीएनडीटी कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू अाहे.  
 
अल्पावधीत कमावली माया  
बाबासाहेब खिद्रापुरे मूळचा काेल्हापूर जिल्ह्यातील शिराेळ तालुक्याचा. मात्र गेल्या दहा-बारा वर्षांपासून त्याने म्हैसाळा येथे प्रॅक्टिस सुरू केली अाहे. लाखाे रुपये कमाई करणाऱ्या खिद्रापुरेने अल्पावधीतच ‘भारती’ रुग्णालयाची टाेलेजंग इमारत उभारली अाहे. मात्र म्हैसाळा गाव व पंचक्राेशीपेक्षा बाहेरगावच्या रुग्णांचीच त्याच्याकडे जास्त गर्दी असायची, असे स्थानिक गावकरी सांगतात.
 
ओढ्यामध्ये विल्हेवाट
- गर्भपात करताना मोठे अर्भक असेल तर त्याची विल्हेवाट  गावातील ओढ्यामध्ये अाराेपी लावायचा, अशी माहिती मिळाली अाहे. फरार खिद्रापुरे याचा तपास करण्यासाठी पाेलिसांची पाच पथके रवाना केली अाहेत. लवकरच त्याला अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल.  
-  दत्तात्रय शिंदे, पोलिस अधीक्षक, सांगली.  
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, गर्भपात प्रकरण विधिमंडळात गाजले... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...