आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कर्मचाऱ्यांनो तुमचे दर्शन घ्यायला हवे' विभागीय आयुक्त डॉ. भापकरांकडून अधिकऱ्यांची खरडपट्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- उस्मानाबादच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनो तुमचे जाहीर दर्शन घेतले पाहिजे, शासनाची फुकटची पगार खाऊन बांडगुळाप्रमाणे वाढलात, अशा शब्दात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सर्वांची जाहीर खरडपट्टी केली. कोणत्याच योजनेत समाधानकारक काम झाले नसल्याचे पाहून उस्मानाबादकडून भ्रमनिरास झाला असल्याचे सांगून त्यांनी नाराजीही व्यक्त केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून विविध योजनांसंदर्भात आढावा बैठक घेण्यात येत असल्यामुळे विभागीय आयुक्त डॉ. भापकर झालेल्या कामासंदर्भात माहिती घेण्यासाठी मराठवाड्यात जिल्हास्तरीय बैठका घेत आहेत. मराठवाड्यातील सहावी बैठक त्यांनी उस्मानाबाद येथे शुक्रवारी (दि. ५) घेतली. नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी तसेच महसूल अन्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते.
 
व्यासपीठावर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपायुक्त विजयकुमार फड, झेडपी अध्यक्ष नेताजी पाटील, सीईओ आनंद रायते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील यादव, जिल्हा अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी शिरीष जमदाडे आदी अधिकारी उपस्थित होते. 

डाॅ. भापकर यांनी प्रत्येक योजनेचा विभागनिहाय अाढावा घेतला. हातात बिनतारी माईक घेऊन ते समोर बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये फिरत होते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, पाणंदमुक्त अभियान, स्वच्छता अभियान, मागेल त्याला शेततळे, विंधन विहिरींचे नियोजन, विविध आवास योजना आदींसंदर्भात डॉ. भापकर यांनी थेट विचारणा केली. मात्र, काही योजना वगळता एकाही योजनेमध्ये लक्ष्य साध्य केले नसल्याचे आढळून आले. प्रत्येक योजनेचा आढावा घेत असताना डाॅ. भापकर यांचा पारा चढत गेला. 

मराठवाड्यात सर्वत्र बैठका घेत फिरलो. मात्र, सर्वात अधिक भ्रमनिरास उस्मानाबादने केला असल्याचे सांगत त्यांनी सर्वच उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांची त्यांनी खरडपट्टी काढली. उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील किती कर्मचारी आहेत, याबद्दल विचारणा केली. तेव्हा काही बोटावर मोजन्याइतके कर्मचारी सोडले तर सर्वांनी हात वर केले. अापण येथील कर्मचारी असतानाही कामांमध्ये शिथिलता का, अशी विचारणा करत शासनाचा फुकटचा पगार घेताना आपल्याला लाज वाटत नाही का, बांडगुळाप्रमाणे आपली वाढ झाली आहे. असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांवर टीका केली. स्क्रीनवर योजना अपूर्ण असल्याचे समोर येत गेल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना तुमचे दर्शन घेतले पाहिजे, असे सांगत उघड नाराजीही व्यक्त केली.
 
दोनच हात वर...
सुरुवातीलात्यांनी १०० शेततळ्याचे काम करणाऱ्या कृषी सहायकांबद्दल विचारले. मात्र, एकाचाही हात वर झाला नाही. ५० तळे कोणी तयार केली, असे विचारल्यावरही अशीच स्थिती होती. अखेर ४० तळ्याबाबत विचारणा केल्यावर केवळ दोन हात वर आले. त्यांचे उघड कौतुकही डॉ. भापकर यांनी केले. 

कर्मचारी बसले पायऱ्यांवर...
नाट्यगृहाचीमर्यादा ७५० असताना सर्व मिळून १४०० कर्मचाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यामुळे बसण्यासाठी अासनच शिल्लक नव्हते. यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांना खाली बसून बैठकीत भाग घ्यावा लागला. अनेकजण तर बाहेर पोर्चमध्ये उभे होते. त्यांना बैठकीत सहभागी होता आले नाही.
 
योजनांचा बट्ट्याबोळ...
बहुतांशयोजनांची कर्मचाऱ्यांनाच माहिती नव्हती. ९७ ग्रामपंचायती योजनात मागे आहेत. योजनांचा बट्ट्याबोळ उडाल्याचे सांगून ३० मेपर्यंत पूर्ण करा, अन्यथा निलंबनाचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
 
...अन् डुलक्या 
नियोजित वेळेपेक्षा बैठक दीड तास विलंबाने सुरू झाली. डाॅ. भापकर कर्मचाऱ्यांची हजेरी घेत होते. मात्र, काहीच सोयरसूतक नसल्यासारखे अनेक कर्मचाऱ्यांनी डुलकी घेणे पसंत केले. तसेच काहीना माेबाइलवर गेम खेळणे, व्हॉट्सअॅप पाहण्याचा मोहही कर्मचाऱ्यांना आवरला नाही. 

...उठले कर्मचारी 
योजना अंमलबजावणीसाठी ३०० ग्रामसंपर्क अधिकाऱ्यांची निवड पूर्वीच झाली आहे. मात्र, डॉ. भापकर यांनी उठण्याचा आदेश देताच केवळ चारजण उभे राहिले. यामुळे डॉ. भापकर चांगलेच भडकले. उर्वरित संपर्क अधिकाऱ्यांना त्यांनी निलंबित करण्याचे आदेश देताच अन्य अधिकारी गडबडीत उभे राहिले. 
बातम्या आणखी आहेत...