आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यधुंद चालकाच्या हाती स्टिअरिंग, व्हॉट्सअॅप पोस्टची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - शनिवारी सायंकाळी औरंगाबादहून लातूरकडे जाणाऱ्या बसचा चालक दारूच्या नशेत बस चालवत असल्याचा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी मांजरसुंबा बसस्थानकावरच बस थांबवून पुढे जाण्यास नकार दिला. दोन तासानंतर दुसरा चालक मिळाल्यावर प्रवासी सुटकेचा नि:श्वास टाकत पुढच्या प्रवासाला गेले. दरम्यान, व्हॉटसअॅप ग्रुप वरून जिल्हाधिकारी राम यांच्यापर्यंत माहिती गेल्याने त्यांनी एसटी प्रशासनाशी संपर्क साधताच अधिकाऱ्यांची मांजरसुंब्याकडे धावाधाव झाली. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता मांजरसुंबा येथे हा प्रकार घडला.
औरंगाबाद - बीड - लातूर बस (एम. एच २०, बीएल २३८६द) शनिवारी सायंकाळी बीडहून लातूरकडे निघाली होती. यात जवळपास ८१ प्रवासी होते. चालक गणपत कार्ले मद्यधुंद अवस्थेत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. त्यामुळे काही प्रवाशांनी चालकाला गाडी चालवण्यास विरोध केला.

अखेर बीडनंतरच असलेल्या मांजरसुंबा बसस्थानकातच प्रवाशांनी गाडी रोखून धरत दुसरा चालक दिला तरच पुढचा प्रवास करू असा पवित्रा घेतला. दोन तास हा प्रकार सुरू होता. अखेर रात्री साडेआठ वाजता प्रवाशांना दुसरी गाडी मिळाली.

दरम्यान, या प्रकाराची पोस्ट, फोटो तत्काळ सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्रवाशांनी बीडच्या एसटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु, तो झाला नाही. शेवटी व्हॉट्सअॅपवरून बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यापर्यंत ही माहिती गेली. त्यांनी बीडचे आगारप्रमुख ए. ए. जानराव यांच्याशी संपर्क करून त्या चालकावर कारवाई करून दुसऱ्या बसची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आगारप्रमुखांनी थेट मांजरसुंबा गाठले होते. पोलिसांनी त्या मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले होते. आगारप्रमुखांच्या तक्रारीनंतर औरंगाबाद डेपोचा चालक गणपत कार्ले विरोधात नेकनूर ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला.

घाटात घाबरले प्रवासी
मांजरसुंब्याचा घाटातूनही चालकाने तशाच अवस्थेत गाडी चालवली. त्यातच दुपारपासून बीडसह परिसरात रिमझिम पाऊस सुरू होता. रस्त्यावर चिखलही होता. जर अपघात झाला असता तर ८१ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. जीव मुठीत धरूनच प्रवाशांनी बीडहून मांजरसुंबा गाठले. प्रवाशांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.

पर्यायी व्यवस्था केली
^मी स्वत: स्पॉटवर गेलो प्रवाशांना दुसऱ्या गाडीत व्यवस्था करून दिली आहे. पोलिसांत तक्रारही देत आहोत त्यानंतर त्या चालकावर कारवाई होईल. औरंगाबाद डेपोचा हा चालक आहे.
ए. ए. जानराव, आगारप्रमुख, बीड

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...