आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप मातीत, पिकांमध्ये कुळव, पावसाअभावी भूम तालुक्यात विदारक चित्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पाथरुड - तब्बल महिनाभरापासून दडी मारलेला पाऊस आज-उद्या येईल अशी आशा लागलेल्या अंभी (ता.भूम) महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पावसाने अखेर दगाच दिला. तब्बल चाळीस दिवसांपासून गायब झालेल्या  पावसामुळे खरीप हंगामातील पीक मातीमोल झाले असून, वाळून चाललेल्या या पिकात पाळी घालण्याचे काम शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. मंडळातील सुमारे ९ हजार हेक्टरवर कुळव फिरवले जात आहे.  
 
गतवर्षीप्रमाणे यंदाही चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने नियोजन करीत मोठ्या प्रमाणात खरिपातील पिकांची पेरणी केली. मात्र, पेरणी झाल्यापासूनच पाऊस हुलकावणी देत होता. हवामान खात्याचे सर्व अंदाज फोल ठरत अखेर शेतकऱ्यांचा महत्त्वाचा खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी पुन्हा नव्या संकटाच्या दारात उभा आहे.   
 
पेरणीसाठी हेक्टरी वीस ते पंचवीस हजार रुपये झालेला खर्च आता कसा काढायचा, या विवंचनेत शेतकरी आहे.  भूम तालुक्यातील अंभी महसूल मंडळात यंदा सरासरी म्हणजे ९ हजार हेक्टरवर खरिपाची  पेरणी झाली आहे. गतवर्षी तुरीला कवडीमोल भाव मिळाल्याने या वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, उडदाची अधिक क्षेत्रावर पेरणी केली. मात्र आशेवर पाणी फेरले असून तब्बल चाळीस दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने या भागातील खरीप पिकांची अक्षरश: राख होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांमध्ये पाळी घालण्यास सुरुवात केली आहे.  गतवर्षीप्रमाणे यंदाही चांगला पाऊस होईल, या अपेक्षेने परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यापासूनच शेताची चांगली तयारी केली होती. मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडल्याने आवडीनुसार पिकांची पेरणीही केली.   
बातम्या आणखी आहेत...