आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक कामात कुचराई करणाऱ्यांवर कठोर कारवाई; राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - ग्रामपंचायत व नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, अशा सूचना देतानाच निवडणुकीच्या कामात िनष्काळजीपणा व कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा  राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज येथे दिला.   

नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृहात ग्रामपंचायत व नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूकसंदर्भात आढावा बैठक सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी उपस्थित होते.   

आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा, अशा सूचना सहारिया यांनी केल्या. कायदा व सुव्यवस्थेसंबंधी आढावा घेताना वस्तू अथवा पैशांच्या स्वरूपातील प्रलोभनाला आळा घालणे, अवैध दारू वाहतुकीवर व वाटपावर नजर ठेवणे,  मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहीम हाती घ्यावी, असे ते म्हणाले. या वेळी थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदा मतदान होत आहे. बहुसदस्यीय पद्धतीनुसार आवश्यक तेवढी मते देण्याबाबत मतदार जागृती करण्यात यावी. दिव्यांग मतदारांना मतदान करता यावे यासाठी व्हीलचेअर, रॅम्पची व्यवस्था करणे, मतदान केंद्रे सर्व सुविधांनी अद्ययावत व अाधुनिक असावेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पद्धतीनेच या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यावर भर दिला पाहिजे, अशा सूचनाही सहारिया यांनी या वेळी दिल्या.
बातम्या आणखी आहेत...