आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण कर्मचाऱ्यांकडून 34 लाखांचा दंड वसूल, 6 कर्मचाऱ्यांना करण्यात आले सेवेतून कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- महावितरणच्या लातूर मंडळाअंतर्गत येणाऱ्या तीन जिल्ह्यांतील दोषी आणि कामचुकार कर्मचाऱ्यांविरोधात आलेल्या तक्रारींची चौकशी करून कंपनीच्या वरिष्ठांनी तब्बल ३४.३३ लाखांचा दंड वसूल केला आहे. त्याचबरोबर वेतनवाढी रोखणे, नोकरीतून कमी करणे अशा शिक्षाही फर्मावण्यात आल्या आहेत, अशी माहिती महावितरणच्या लातूर मंडळातील मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक नामदेव पवार यांनी  दिली.
 
गेल्या वर्षभरात महावितरणच्या लातूर मंडळातील मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक पवार यांनी लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात  कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न निकाली काढले. यामध्ये कामातील निष्काळजीपणामुळे कारणे दाखवा नोटीस दिलेल्या प्रकरणांपैकी १२३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
 
त्यामध्ये १२५ कर्मचाऱ्यांना ४.२५ लाख रुपयांचा दंड ठोठावून त्याची वसुली करण्यात आली, तर ८७६ कर्मचाऱ्यांना कामात सुधारणा करण्याची  सक्त ताकीद देण्यात आली. तसेच ३० कर्मचाऱ्यांना वेतनाच्या एकतृतीयांश दंडाची शिक्षा ठोठावून तो वसूल करण्यात आला.  
 
महावितरणमध्ये ग्राहक तक्रारी, कामातील गंभीर स्वरूपाची कुचराई, महसूल वसुलीत दिरंगाई तसेच इतर तत्सम कृत्यासाठी आरोपपत्रे दिली जातात. अशा प्रकरणांचा वेळेत निकाल देण्याची आवश्यकता असते. महावितरणच्या लातूर मंडळातील मानव संसाधन विभागाने अशा गंभीर प्रकारात प्रलंबित असलेल्यांपैकी १८०  आरोपपत्रे निकाली काढली. त्यातील ७९ दोषी कर्मचाऱ्यांना ३०.०८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर ५२ कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढी थांबवण्यात आल्या. 

तसेच गंभीर स्वरूपात दोषी आढळून आलेल्या ६ कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. शिवाय पाच दोषी कर्मचाऱ्यांचा निलंबन कालावधी शिक्षेत रूपांतरित करण्यात आला, तर गंभीर दोषारोपपत्रातील ३६ कर्मचाऱ्यांची चौकशीअंती आरोपपत्रातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. 
 
२२ जणांना सेवेत सामावून घेतले
लातूर परिमंडळात गेल्या वर्षात वर्ग ३ व ४ मधील ९४२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली, तर २२ मृत वीज कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्यात आले. याची दखल घेऊन शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नामदेव पवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास लातूरचे लातूर विभागाचे कार्यकारी अभियंता  मदन सांगळे, अशोक जाधव, श्रीकृष्ण कुलकर्णी, मंदार वग्यानी, शशांक इनामदार, महेंद्र बागूल, सुदर्शन काळेवाड,  राहुल गाडे उपस्थित होते.
 
बातम्या आणखी आहेत...