आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना : हंगामी वसतिगृहांना करावी लागेल आता अन्न प्रशासनाकडे नोंदणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - पाटोदा तालुक्यातील दासखेड येथील हंगामी वसतिगृहातील ११ विद्यार्थ्यांना भाकरीतून विषबाधा झाल्याचा प्रकार गुरुवारी घडल्यानंतर अन्न विभागाने आता जिल्ह्यातील सर्वच हंगामी वसतिगृहांना अन्न प्रशासनाकडे नोंद करण्याबाबत आदेश काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे यापुढे असे प्रकार घडल्यास संबंधितांवर थेट गुन्हे नोंंद होऊ शकतील. दरम्यान, अन्नातून विषबाधा होण्याच्या प्रकारात जिल्ह्यात वाढ झाली असून सहा महिन्यांत ही चाैथी घटना अाहे.  

जिल्ह्यातील ऊसतोड कामगार ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झाल्यानंतर त्यांच्या पाल्यांसाठी शासनाने हंगामी वसतिगृह सुरू केले आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीला साडेसहाशे हंगामी वसतिगृह कार्यरत आहेत. 
 
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून यासाठी अनुदानही देण्यात येते. परंतु हंगामी वसतिगृहातून चांगल्या दर्जाचे जेवण विद्यार्थ्यांना दिले जात नसल्याच्या तक्रारी नेहमीच असतात. पाटोदा तालुक्यातील दसखेड येथील हंगामी वसतिगृहातील ११ विद्यार्थ्यांना  बाजरीच्या भाकरीतून विषबाधा झाल्याचा प्रकार गुरुवारी घडला. या विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. 
 
दरम्यान, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सातत्याने अन्नातून विषबाधा होण्याचे प्रकार वाढत असल्याने जिल्ह्यातील सर्व हंगामी वसतिगृहांनाही आता अन्न विभागाकडे नोंदणी करण्याचे आदेश देण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे असा प्रकार झाल्यास संबंधितांवर थेट गुन्हे नोंद होऊ शकतील. अन्न प्रशासनाने याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. शिक्षण विभागाच्या मदतीने लवकरच हे आदेश जारी होणार अाहेत.  
 
तपासणी झाली, कारवाई नाही  
दासखेड येथील हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड आणि सहकाऱ्यांनी या  ठिकाणी भेट देत पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या जेवणात भाकरी दिल्याने त्याचा त्रास होत असेल तर भाकरी न देण्याचे सुचवण्यात आले आहे. दरम्यान, वसतिगृह अथवा चालकावर कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
 
समितीने नाराजी व्यक्त करत सुचविले हाेते मुद्दे  
दोन महिन्यांपूर्वीच राज्य शिक्षण परिषदेने विक्रमसिंह यादव यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यात ४० अधिकाऱ्यांचे पथक पाठवून जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांची तपासणी केली होती. या तपासणीच्या अहवालात हंगामी वसतिगृहांच्या जेवणाच्या दर्जाबाबत सुधारणा करण्याचे सुचविले होते. शिवाय अनेक ठिकाणी एक्स्पायरीनंतरचे कंपन्यांचे पीठ आढळले हाेते. याकडे समितीने लक्ष वेधले होते. सायंकाळी ५ ते ६ ही जेवणाची वेळ चुकीची असून या एेवजी ६ ते ७ ही वेळ करण्याचेही सुचवण्यात आले होते. इतरही अनेक मुद्दे नोंद करण्यात आले आहेत.
 
मुले ठणठणीत, प्रकार गंभीर नाही  
- दासखेडला भेट देऊन पाहणी केली आहे. विषबाधेचा प्रकार नाही. भाकरीमुळे न पचल्याने हा प्रकार झाला असावा अशी शक्यता असल्याने जेवणात भाकरी न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व मुले ठणठणीत असून ती शाळेतही गेली होती.  
हिरालाल कराड, उपशिक्षणाधिकारी, बीड   
 
नोंदणीसाठी पत्र देणार  
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हंगामी वसतिगृहे आहेत. यापुढे असा प्रकार होऊ नये यासाठी सर्व वसतिगृहांना अन्न विभागाकडे नोंदणी करण्याबाबत पत्र देणार आहे. स्वयंपाक तयार करताना घेण्याची काळजी, अन्न सुरक्षा याबाबत त्यांना माहिती देण्यात येईल. १०० रुपये शुल्क भरून वर्षभरासाठी ही नोंदणी होईल.  
सुलक्षणा जाधवर, अन्न सुरक्षा अधिकारी, बीड   
 
जिल्ह्यात ६४७ हंगामी वसतिगृहे  
अंबाजोगाई-१५, आष्टी -४२, बीड -७०, धारूर -१०९, गेवराई -८१, केज - ५७, माजलगाव - ५१, परळी - १८, पाटोदा - ८७, शिरूर- ६८, वडवणी - ४९ अशी एकूण  ६४७ हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात आलीे आहेत.   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...