आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नसुरक्षा योजनेतून २२,६९२ लाभार्थींना होणार लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- दुष्काळी परिस्थिती व वाढत्या शेतकरी आत्महत्या लक्षात घेऊन राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तालुक्यातील ६ हजार १४० शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा पुरवठा विभागाकडे सादर करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी कुटुंबातील जवळपास २२ हजार ६९२ लाभार्थींना अन्नसुरक्षा योजनेतून सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध होणार आहे.

सततची दुष्काळी परिस्थिती व वाढत्या शेतकरी आत्महत्या विचारात घेऊन राज्य सरकारने औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली तसेच अमरावती विभागातील अमरावती, वाशीम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व नागपूर विभागातील वर्धा अशा १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने केशरी कार्डधारक शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्यात फेब्रुवारी २०१४ पासून अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. अन्नसुरक्षा योजनेत ग्रामीण भागातील ७६ टक्के, तर शहरी भागातील ४५ टक्के लोकसंख्येला लाभ देण्यात आला होता. ग्रामीण भागात अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांचा सरसकट समावेश अन्न सुरक्षा योजनेत करण्यात आला होता. काही केशरी कार्डधारकांचाही समावेश झाला होता. परंतु वगळण्यात आलेल्या २४ टक्के लोकसंख्येत शेतकरी होते. केशरी कार्डधारकांना दिवाळीपासून १५ किलो धान्य मिळत नव्हते. ते बंद करण्यात आले होते, तर शहरी भागात ४५ टक्के लोकसंख्येला लाभ देण्यात आला होता. मात्र, मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने राज्य सरकारने केशरी कार्डधारक शेतकऱ्यांनाही या अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ज्या लाभार्थींना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत होता, परंतु राष्ट्रीय अन्नसुरक्षा २०१३ मध्ये केंद्र शासनाने घालून दिलेल्या निकषात जे लाभार्थी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकले नाहीत अशा केशरी रंगाच्या लाभार्थी कार्डधारक शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेमध्ये प्राधान्य कुटुंब लाभार्थींना सवलतीच्या दराने अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शेतकरी हाच निकष
राज्य सरकारने सध्यातरी शेतकरी कुटुंबाला अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुरवठा विभागाकडून शेतकरी कुटुंबाच्या याद्या बनवण्याचे काम सुरू आहे. अल्पभूधारक, बहुभूधारक असा भेदभाव करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरसगट सर्व शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळणार असल्याचे प्रभारी तहसीलदार अभय बेलसरे यांनी सांगितले.

कार्डधारक
३५,८०० केशरी कार्डधारक
१,०७६ शुभ्र कार्डधारक
१८,६१८ बीपीएल
२६० अन्नपूर्णा
४,६०८ अंत्योदय
बातम्या आणखी आहेत...