उस्मानाबाद - मोठ्या-धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नकाच, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावरून माघार घेतली. मात्र, सर्वसामान्य शेतकऱ्यांना शाब्दिक जंजाळात अडकवून त्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवल्यास सरकारला धारेवर धरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पक्षबांधणीच्या दौऱ्यानिमित्त पवार रविवारी (दि. १८) उस्मानाबाद येथे आले होते. या वेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांची उपस्थिती होती.
माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, इतिहासात कधीच न घडलेला शेतकऱ्यांचा संप राज्यात
झाला. यामुळे राज्य शासनाने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. आता सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नसल्याचे सांगितले जात आहे. टॅक्स भरणारे, दांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा शेतकऱ्यांना यातून वगळायचे असेल तर खुशाल वगळा. त्यांना कर्जमाफी देण्याचे समर्थन कोणीही करणार नाही. मात्र, गरजू शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार की नाही याबाबत संशय निर्माण होत आहे.
महसूलमंत्र्यांसोबत बोलणी
पवार म्हणाले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी कर्जमाफीच्या निकषाबाबत बोलणी झाली होती. धनंजय मुंडेही सोबत होते. त्या वेळी शेकापचे गणपतराव देशमुख, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे यांनाही चर्चेसाठी बोलावले असल्याचे सांगितले होते. नंतर कोणत्याही विरोधी नेत्याला विश्वासात न घेताच निकष ठरवण्यात आले.