आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा डेपो सुरू करण्याबाबत येत्या दहा दिवसांत निर्णय घेणार, पालकमंत्र्याची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - "जनावरांसाठी चारा आणि पाणी मिळणे महत्त्वाचे असून त्या दृष्टीने चारा डेपो किंवा चारा छावणी सुरू करण्यासंदर्भात येत्या दहा दिवसांत निर्णय घेतला जाईल,' अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. दरम्यान, शेतकऱ्यांजळील चारा संपला असून एक-एक दिवस कसा जाईल, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे, परंतु मंत्रिमहोदय व प्रशासकीय यंत्रणा आणखी कशाची वाट पाहत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या नियोजन समिती सभागृहात शुक्रवारी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले, सलग चौथ्या वर्षीही पाऊस झाला नसल्याने टंचाईची परिस्थिती आहे. केवळ १३ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला असून ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून या आपत्तीवर मात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेतकऱ्यांना मदत होईल, सर्वांनी सहकार्य करण्याची सूचना त्यांनी केली.
ज्या शेतकऱ्यांचे अधिग्रहणाचे पैसे देणे बाकी आहेत, त्यासंदर्भात मंत्रालय पातळीवर निर्णय घेऊन संबंधितांना येत्या काही दिवसांत हे पैसे मिळतील, यासंदर्भातील कार्यवाही केली जाईल. चारा छावणी अथवा चारा डेपो यापैकी जे त्या-त्या ठिकाणी सोईस्कर असेल आणि मागणी असेल, त्या पद्धतीने सुरू करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. येत्या १० दिवसांत यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. याशिवाय, तत्काळ शेतकऱ्यांना मदत होईल, त्यासाठी नियोजन समितीचा ५ टक्के निधी उपयोगात आणला जाईल. हा निधी टंचाई उपाययोजनांसाठी वापरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी विविध लोकप्रतिनिधींनीही टंचाईसंदर्भात आपले म्हणणे मांडले. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार, राणाजगजितसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, पोलिस अधीक्षक त्रिमुखे उपस्थित होते.

प्रत्येक गावात रोहयोची पाच कामे
जिल्ह्यातील प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेची किमान पाच कामे सुरू करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले.

मजुरी वाढण्याबाबत विचार
उस्मानाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यात मजुरांची मजुरी वाढवण्याबाबत काही करणे शक्य आहे का, त्याचाही आढावा घेतला जाईल, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले. तसेच सध्या मजुरांना कामाची आवश्यकता आहे. त्यामुळे जास्त अटी न लावता त्यांना काम उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

वीज तोडल्यास बिले पाठवू नका
ज्या शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्यात आली आहे, त्यांना वीज बिले पाठविण्यात येऊ नयेत, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन महावितरण करत नसल्याचा कटू अनुभव आहे. तसेच अध्यादेश असल्याशिवाय कोणतीच प्रक्रिया महावितरणकडून राबवली जात नाही. त्यामुळे मंत्रिमहोदयांच्या अादेशाचे महावितरण कितपत पालन करते, हे अागामी काळात स्पष्ट होईल.
टंचाई निवारणार्थ उपाययोजना
टंचाईच्या उपाययोजना तत्काळ करण्याबाबत कार्यवाही करा, नळ पाणीपुरवठा योजना अथवा संबंधित ठिकाणी उपाययोजना करण्यासंदर्भात काय करता येईल, याबाबत पाठपुरावा करून, आवश्यक तेथे राज्य शासनाची परवानगी घेऊन निधीही उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी गाळमिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारींची तत्काळ दखल घ्या, पाणी नमुने तपासून ते पिण्यायोग्य असल्याची खात्री करूनच पुरवा, असे निर्देशही त्यांनी दिले.
बातम्या आणखी आहेत...