आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केज नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चौथ्याच दिवशी फसवणुकीचा गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज- चार दिवसांपूर्वी केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची माळ गळ्यात पडलेले काँग्रेसचे आदित्य पाटील  यांच्या आनंदावर विरजण  पडले आहे. त्यांच्यासह माजी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अभियंता, गुत्तेदार, नगरसेवक अशा सहा जणांनी प्रभाग क्रमांक १२ मध्ये रस्ता, नालीचे काम न करता सात लाख ३६ हजार ७८६ रुपयांचा अपहार  केल्यावरून न्यायालयाच्या आदेशावरून  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केज पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून  गुन्हा नोंद करण्यात आला आहे.   

 
केज नगरपंचायतीला २०१४ मध्ये शासनाकडून विशेष रस्ते अनुदान योजनेअंतर्गत तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातून शहरांतर्गत सिमेंट रस्ते आणि नाली बांधकाम करणे  गरजेचे आहे. नगरपंचायतीने प्राप्त निधीमधून दोन कोटी ९४ लाख ६९ हजार २५५ रुपयांची एकूण ६३ कामे प्रस्तावित करत त्याला  जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता घेतली.  मात्र मुख्याधिकारी आणि  पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांची कामे न करताच निधीवर डल्ला मारल्याचे अनेक प्रकार समोर आले. प्रभाग क्र. १२ मध्ये ( पूर्वीचा प्रभाग क्र. नऊ  ) नखाते यांचे घर ते भागवत गुंड यांच्या घरापर्यंत रस्ता कामासाठी नगरपंचायतीने सात लाख ८० हजार १११ रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र संबंधितांनी रस्त्याचे काम कागदोपत्री पूर्ण करून त्यातील सात लाख ३६ हजार ७८६ रुपयांचा अपहार केला. हा प्रकार स्थानिक नगरसेविका मालती गुंड यांच्या लक्षात येताच त्यांनी पंचायतीकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली. मात्र पंचायतीने त्यांना दाद न दिल्याने त्यांनी केज पोलिसात धाव घेऊन यंत्रणेविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.  


अपहार प्रकरणातील आरोपींचे राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर वजन असल्याने केज पोलिसांनीदेखील  गुंड यांच्या तक्रारीची फारशी दखल घेतली नाही. शेवटी त्यांनी केज न्यायालयात धाव घेत मुख्याधिकारी पुष्पगंधा बालासाहेब भगत, गुत्तेदार विलास ज्ञानोबा थोरात, नगराध्यक्ष कबीरोद्दीन नसिरोद्दीन इनामदार, उपनगराध्यक्ष आदित्य अशोकराव पाटील, नगरसेवक पशुपतिनाथ दांगट, आणि सल्लागार अभियंता सुभाष जी. रोकडे यांच्या विरुद्ध अपहार, फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्याची  तक्रार दिली.   


चौकशी अहवालाचे दिले होते आदेश    
केज न्यायालयातून हे प्रकरण ७ सप्टेंबरला अंबाजोगाईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात वर्ग झाल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी न्या. के.आर. चौधरी यांनी मुख्याधिकाऱ्यांसह पदाधिकारी, गुत्तेदार, आणि अभियंत्याविरुद्ध फौ.प्र. सं. च्या कलम १५६ ( ३ ) प्रमाणे चौकशी करून दहा आठवड्यांत चौकशी अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश बीडच्या  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते.    


सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा    
बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी या प्रकरणात न्यायालयात चौकशी अहवाल सादर केला.  चौकशी अहवाल व तक्रारीवरून अखेर   सहा जणांविरुद्ध फसवणुकीसह भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.   


निवडीच्या आनंदावर विरजण पडले    
केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शुक्रवारी काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचे पुत्र आदित्य पाटील यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली. चौथ्या  दिवशी गुन्हा नोंद झाल्याने त्यांच्या निवडीच्या आनंदावर विरजण पडले. कार्यकर्त्यांतही नाराजी पसरली आहे.  


भ्रष्टाचार झालेला नाही
हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असून आमचे काम काही लाेकांना पाहवत नाही.  त्या प्रकरणावर माझी कुठलीच स्वाक्षरी नाही. सर्वसाधारण सभेत रस्त्याचा प्रस्ताव मजूंर केला होता.  टेंडरवर माझी स्वाक्षरी नाही. आम्ही संबंधित कंत्राटदाराकडून पैसे भरून घेतले असून अभियंत्यावरही कारवाई केली आहे. त्यामुळे यात भ्रष्टाचार झालेला नाही.  
- आदित्य पाटील, नगराध्यक्ष , नगरपंचायत,  केज

बातम्या आणखी आहेत...