आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत ५५ वर्षांनंतर प्रथमच गांधी चौकाचे सुशोभीकरण, १६ लाख रुपये खर्चाची तरतूद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या येथील गांधी चौकाचे ५५ वर्षांनंतर प्रथमच सुशोभीकरण करण्यात येत आहे. १६ लाख रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या या कामात जिवंत झाडे तोडून सिमेंटचे पोल उभे करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
  
येथील गांधी चौकात १९६० मध्ये महात्मा गांधी यांचा पुतळा स्थापन करण्यात आला. त्या वेळी नगर परिषदेने या पुतळ्याच्या आजूबाजूला अशोकाची झाडे लावून   परिसर हिरवागार केला होता. गेल्या वर्षापासून वयोमानामुळे ही अशोकाची झाडे सुकू लागली. त्यामुळे गांधी चौकाचे सौंदर्य कमी झाले. नगर परिषदेने पुतळ्याच्या परिसराचे पुन्हा सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी नगर परिषदेने तसा ठराव घेतला आणि त्या कामासाठी १६ लाखांच्या निधीची तरतूद केली.
 
हा निधी आता खर्च होत आहे. परंतु या कामात १०० टक्के सिमेंट काँक्रीटचा वापर होत आहे. अशोकाची झाडे तोडून त्या ठिकाणी सिमेंटचे खांब उभे करून त्यावर रंगीबेरंगी प्रकाश दिवे लावण्याची नगर परिषदेची योजना आहे. याशिवाय पुतळ्याच्या वर्तुळाकार भागातही कोणतीही हिरवळ न लावता केवळ मार्बल फरशी अंथरली जाणार आहे. नगर परिषदेच्या या आराखड्यामुळे निसर्गप्रेमींचा मात्र सुशोभीकरणाच्या कामामुळे हिरमोड होत आहे. पुतळ्याच्या आजूबाजूला किमान कमी उंचीची झाडे लावावीत, अशी मागणीही होत आहे. एकीकडे झाडे लावण्याचे प्रयत्न शासन स्तरावरून होत असताना आणि त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असताना नगर परिषद मात्र काँक्रीटच्या कामातून सुशोभीकरण करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

झाडेही लावली 
महात्मा गांधी पुतळ्याशेजारील झाडे वाळण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे ही झाडे तोडण्यात आली आहेत. परंतु ही झाडे तोडण्यापूर्वी नगर परिषदेने सुमारे २०० झाडे आंबेडकर चौक ते इंदिरा चौक या मार्गावर लावली आहेत. गरज पडल्यास गांधीजींच्या पुतळ्याशेजारीही कमी उंचीची झाडे लावली जातील.’
- दिलीप चव्हाण, उपनगराध्यक्ष, हिंगोली.
 
बातम्या आणखी आहेत...