आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक बलात्कार करून महिलेचा अमानुष छळ, अंगावर लघुशंकाही केल्याचा तक्रारीत आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
लातूर - एका महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार करून तिचा अमानुषपणे छळ केला.  हा प्रकार उदगीरमध्ये गुरुवारी रात्री घडला. पोलिसांनी दोन दिवस हे प्रकरण चौकशीवर ठेवून शुक्रवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही.  
 
उदगीरमध्ये मोलमजुरी करणारी एक महिला गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शेल्हाळ रोडवरून अॉटोरिक्षात बसून आपल्या बोधेनगर या परिसरात जात होती. त्या वेळी शाहू चौकात  या रिक्षात तिघे जण बसले. त्यांनी रिक्षाचालकाला धमकावून रिक्षा शेल्हाळ रोडवर शहराबाहेर न्यायला भाग पाडले. तेथे आडवळणाला नेऊन या तिघांनी त्या महिलेवर बलात्कार केला. एवढेच नव्हे, तर अमानुषतेचा कळस गाठत या तिघांनी महिलेच्या गुप्तांगात खडे टाकून गुप्तांगावर लाथांचा प्रहार केला. याहीपुढे जाऊन त्यातील एकाने महिलेच्या अंगावर लघवी केली. त्यानंतर तिला तेथेच टाकून तिघे पसार झाले. पीडित महिला रस्त्याच्या कडेला विव्हळत पडली असताना रस्त्यावरून जाणाऱ्या एकाने तिला उदगीर पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. तिच्या जबाबावरून तक्रार घेतली तरी गुन्हा नोंदवण्यात आला नाही. पोलिसांनी हा प्रकार कुणाला कळणार नाही, याची दक्षता घेतली. अखेर शुक्रवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु यातील आरोपींना पकडण्यात अद्याप यश आले नाही. दरम्यान, या पीडित महिलेवर उदगीरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
 
पोलिसांचा नातेवाइकांवर संशय  
दरम्यान, याप्रकरणी उदगीरचे पोलिस उपाधीक्षक अनिकेत भारती यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रकार महिलेच्या जवळच्याच नातेवाइकांनी केला असावा, अशी शंका व्यक्त केली. विशेष म्हणजे पोलिसांनी या महिलेच्या सावत्र मुलाला ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, त्यामागचे सत्य अद्याप उजेडात आलेले नाही. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक तपासासाठी रवाना झाल्याचे भारती यांनी सांगितले.