आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिघांच्या मृत्यूचे गूढ असताना भावाचाही आत्महत्येचा प्रयत्न; वृद्धाचा मृतदेह आढळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- गेवराई तालुक्यातील सुशी गावात तीन दिवसांपूर्वी पती-पत्नी व मुलाच्या मृत्यूचे गूढ कायम असतानाच त्यांच्याच कुटुंबातील सख्ख्या भावाने शेजारच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. गावातील तरुणांनी त्याला आत्महत्येपासून रोखले आहे. त्याच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान शुक्रवारी सकाळी दगडू घुमाडे या वृद्धाचा याच गावातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळ उडाली.      

गेवराई तालुक्यातील सुशी गावातील  ४० टक्के लोक दसरा, दिवाळीच्या तोंडावर ऊसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याकडे स्थलांतरित होतात. ऊसतोड कामगार तुळशीराम पवार यांचा विवाह अकरा वर्षांपूर्वी खरवंडी (ता.पाथर्डी) येथील नवनाथ ढगे यांची कन्या जयश्री बरोबर झाला होता. विवाहानंतर तुळशीरामला पल्लवी (९) मुलगा सुरेश (७)अशी दोन अपत्ये  झाली. चार वर्षांपूर्वी राजेंद्र व तुळशीराम हे दोन्ही भाऊ  वेगळे राहू लागले. 

 सोमवारी ऊसतोडणीला जाण्यापूर्वी आपल्या शेतातील ज्वारीची खुरपणी करण्यासाठी तुळशीराम पत्नी जयश्री व मुलगा सुरेश बरोबर शेतात गेले तर मुलगी पल्लवी ही आजीबरोबर एका शेतकऱ्यांच्या शेतात भुईमूग काढण्यासाठी गेली होती.  दरम्यान तिघेही घरी न परतल्याने कुटुंबाची चिंता वाढली होती. मंगळवारी सकाळी तुळशीराम पवार याचा भाऊ राजेंद्र पवार याने गेवराई पोलिस ठाण्यात तिघे हरवल्याची तक्रार दिली होती. दरम्यान शेजारच्या विहिरीत मंगळवारी दुपारी जयश्री यांचा तर बुधवारी सकाळी तुळशीराम व मुलगा सुरेश यांचा मृतदेह आढळून आले.   नातेवाइकांनी तिघांच्या घातपाताचा संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.    

शेवगावहून गावात दहा वर्षांपूर्वी आले    
वृद्ध दगडू घुंडरे यांचे मूळगाव शेवगाव तालुक्यातील खामपिंपरी असून दहा वर्षांपूर्वी ते एकटेच सुशी या गावात उदरनिर्वाहासाठी नातेवाइकाकडे आले होते. 
 
भावाचा आत्महत्येचा प्रयत्न    
या गुन्ह्याचा तपास पोलिस करत असतानाच शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तुळशीराम पवारचा भाऊ राजेंद्र पवार (३४) हा शेजारचे घर मालक मुळूक हे ऊसतोडणीला गेल्याचे पाहून व त्यांच्या घरात एक वयोवृद्ध आजी  असल्याचे पाहून राजेंद्र याने  त्यांच्या घरात प्रवेश करून दरवाजाला कडी लावून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अचानक एका महिलेला हा प्रकार समजल्याने तिने आरडाओरडा केला. तेव्हा गावातील तरुणांनी धावत जाऊन दरवाजा तोडून त्याच्या गळ्याचा फास काढून त्याला तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. राजेंद्र पवार याने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप समोर आले नाही.    
 
चारही मृतदेह आढळले विहिरीत   
सुशी येथील तुळशीराम लक्ष्मण पवार  त्यांची पत्नी व मुलाच्या मृत्यूचे गूढ कायम असताना शुक्रवारी सकाळी विहिरींमध्ये दगडू ठमाजी घुंडरे ( ६५ रा.खामपिंपरी ता.शेवगाव) यांचा मृतदेह आढळून आल्याने  सुशी गावात एकच खळबळ उडाली. चार दिवसांत गावात चौथा मृत्यू असल्याने सुशी येथील  ग्रामस्थ हादरून गेले आहेत. 
  
व्हिसेरा राखून ठेवला    
सुशी येथील तुळशीराम पवार त्याची पत्नी व मुलाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी बीड येथील जिल्हा रुग्णालय करण्यात आली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच तिघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.  
- सुरेश बुधवंत ,पोलिस निरीक्षक ,गेवराई    
बातम्या आणखी आहेत...