भूम - तालुक्यात पंचायत समितीच्या गुडमाॅर्निंग पथकाने उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोटाप्रेमींवर वेगळ्या पद्धतीने कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. शनिवारी (दि.१५) सुकटा येथे सकाळी उघड्यावर शाैचाला जाणाऱ्या ४० लोटाप्रेमींवर दंडात्मक कारवाई केली. शिवाय त्यांना शाळेत विद्यार्थ्यांसमोर हजर करून शाळा परिसर झाडण्याची वेगळी शिक्षाही करण्यात आली.
पंचायत समितीतर्फे उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे दंड केला जात आहे. शनिवारी या पथकाने ४० जणांकडून ८००० रुपये दंड वसूल केला. पकडण्यात अालेल्या ४० लोटाप्रेमींना गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांसमाेर हजर करून न्यायालयाप्रमाणे अदालत भरवण्यात आली. त्यातील निर्णयाप्रमाणे व्यक्तींना शाळेचा परिसर झाडण्याची शिक्षा सुनावण्यात अाली.
पथकप्रमुख व्ही. जे. वाघमारे नागरिकांसह विद्यार्थ्यांना शिक्षण, अाराेग्य शिक्षण, वैयक्तिक स्वच्छता, शौचालय बांधून वापराबाबत सर्वांना मनोरंजनातून माहिती देत आहेत. या वेळी ग्रामसेवक अनिल चव्हाण, जे. एल. गोरे, डी. एस. गोरे, पी. जे. गोरे, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ विद्यार्थी हजर होते.
पालकांना होता संकोच
आपल्याच पाल्यांसमोर शिक्षा म्हणून झाडू मारताना लोटाप्रेमींना संकोच वाटत होता. अशा अनेक क्लृप्त्या लढवून स्वच्छता मोहीम यशस्वी करून गावे १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याचा धडाका सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा शौचालय बांधण्याकडे ओढा दिसून येत आहे.