आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडेंच्या प्रेरणेने शेतकऱ्यांना सुखी करणार : मुख्‍यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विचार व्‍यक्‍त करताना अमित शहा. - Divya Marathi
विचार व्‍यक्‍त करताना अमित शहा.
बीड - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणेने पाच वर्षांत राज्य सरकार शेतकऱ्यांचे जीवनमान सुखकर करण्याचा प्रयत्न करीत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी परळीत दिली.

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ परळी तालुक्यातील पांगरी येथे गोपीनाथगडाच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा अध्यक्षस्थानी होते. मुख्यमंत्री म्हणाले, मुंडे राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारी मोडीत काढली. पोलिसांना गाेळीचे उत्तर गोळीनेच देण्याचे आदेश काढून सुरक्षितता निर्माण केली. त्यांच्याप्रमाणेच राज्यातील गुन्हेगारी मोडून काढण्याचे काम मी करणार आहे. मुंडे यांचे आशीर्वाद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, दाऊद इब्राहिम असो वा अन्य, राज्यावर कोणाचीच वाकडी नजर पडू देणार नाही.

सामान्य जनतेला न्याय देणार
मुंडे यांनी सामान्य जनतेला न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी स्वत:चे जीवन अर्पण केले. राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री राहून त्यांनी स्वत:च्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला, अशी टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली. या वेळी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, िशक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण व कामगारमंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, खासदार रामदास आठवले, खासदार राजू शेट्टी, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, कारखान्याच्या संचालिका अॅड. यशश्री मुंडे, आमदार विनायक मेटे, आर. टी. देशमुख, अॅड. लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, प्रज्ञा मुंडे आदी उपस्थित होते. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी प्रास्ताविक, तर सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. फुलचंद कराड यांनी आभार मानले.
मुंडेंच्या अनुभवामुळेच राज्याचे नेतृत्व करतोय
गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासातून मिळालेल्या अनुभवामुळेच आपण राज्याचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकत आहोत. त्यांच्या अचानक जाण्यामुळे आमच्यावर मोठा आघात झाला. मात्र, त्यांची कन्या पंकजाताईंनी या समाजाचे नेतृत्व पुढे चालवल्यामुळे या समाजातील प्रश्नांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गड दीनदुबळ्यांच्या विकासाची प्रेरणा देईल
गोपीनाथगडाच्या निर्मितीमध्ये राज्य शासनाचा पैसा नसून तो केवळ गोपीनाथरावांच्या प्रियजनांनी आपल्या घामाच्या पैशातून उभा केला आहे. हा गड सर्वांना दीनदुबळ्या समाजाच्या विकासासाठी सतत प्रेरणा देत राहील, अशी टिप्पणीही मुख्यमंत्र्यांनी केली.
मुंडेंनी भाजपला वैभव मिळवून दिले : शहा
ऊसतोड मजुराचा मुलगा गावातून थेट राज्याचा नेता होतो. पुढे देशाच्या महत्त्वाच्या खात्याचा मंत्री होऊन लोकनेता होतो ही गौरवाची बाब आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये वैभव प्राप्त करून दिले, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या कार्यक्रमात केले. ते म्हणाले, मी दिल्लीसह देशातील जनतेच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज येथे आलो आहे. भाजपला दलित, कष्टकरी, सामान्यांचा चेहरा देण्याचे काम मुंडे यांनी आपली कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात केले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा मान्‍यवरांच्‍या प्रतिक्रिया आणि पाहा, गोपीनाथ गडाचे फोटोज...