आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडधाकट मजुरांना केले अॅडमिट, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयाचा प्रताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- येथील भोगावती पुलावर कामाच्या प्रतीक्षेत थांबलेल्या मजुरांना शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गवत काढण्याच्या बहाण्याने सकाळी रुग्णालयात नेले. त्यानंतर या धडधाकट असलेल्या मजुरांना चक्क उपचारासाठी अॅडमिट करून घेतले. "आम्हाला कोणताच आजार झाला नसताना अॅडमिट कशासाठी करून घेतले' असा प्रश्न उपस्थित करत मजुरांनी एकच गलका केला. त्यामुळे बोगस रुग्णांना अॅडमिट करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली येथील पथक रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी बुधवारी (दि.१ जुलै) आले होते. रुग्णालयातील स्थिती अलबेल असल्याचे दर्शन या पथकाला घडावे, यासाठी कर्मचाऱ्यांनी हा प्रताप केल्याचे समोर येत आहे.

शहरात तुळजापूर रोडवर प्रशस्त जागेवर शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय आणि महाविद्यालय आहे. सुरुवातीच्या काही वर्षांत या ठिकाणी रुग्णांना चांगली सुविधा पुरवण्यात येत होती. सेवेत अनियमितता होत असल्याने रुग्णांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. तसेच वैद्यकीय अधिकारी कर्मचारी कामाच्या वेळेत गैरहजर रहात असल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना उपचाराअभावी परतावे लागते. दरम्यान, आयुर्वेदिक महाविद्यालयात क्षमतेपेक्षा कमी प्रवेश होत असल्याने हे महाविद्यालय बंद करण्याच्या हालचाली यापूर्वी झाल्या. तसेच यापूर्वीच्या वाद््ग्रस्त डीनमुळेही या आयुर्वेदिक महाविद्यालयाचा कारभार गाजलेला होता.
आयुर्वेदिक उपचाराचे दुष्परिणाम होत नसल्याने अनेकजण या रुग्णालयात जाणे पसंत करतात. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी वेळेवर उपस्थित रहात नसल्याने तसेच सतत कामाला दांडी मारत असल्याने रुग्णालयाचा कारभार पूर्णत: ढेपाळून गेला आहे. बुधवारी नवी दिल्ली येथील भारतीय केंद्रीय चिकित्सा पथक या रुग्णालयाच्या पाहणीसाठी दाखल झाले होते. या पथकातील सदस्य प्रत्येक विभागात जाऊन पाहणी करत होते. एरव्ही गैरहजर राहणारे कर्मचारी यावेळी उपस्थित असल्याचे चित्र पहायला मिळाले.
चित्रीकरणासह केली पाहणी
केंद्रीय पथकातील सदस्यांनी रुग्णालय महाविद्यालयाच्या विविध विभागाची पाहणी केली. यावेळी प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. एरव्ही रुग्णालयात गर्दी नसते. बुधवारी पथक येणार असल्याने रुग्णांसह वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचीही मोठी गर्दी दिसून येत होती.
नातेवाइकांनाही केले अॅडमिट!
ग्रामीण भागातून मजूर शहरातील भोगावती पुलाजवळ जमतात. बांधकाम तसेच अन्य व्यावसायीक गरजेनुसार या ठिकाणाहून मजुरांना घेऊन जातात. बुधवारी आयुर्वेदिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या मजुरांना गवत काढण्याच्या बहाण्याने रुग्णालयात नेले. काम लावण्याऐवजी "तुमचे काही दुखत असेल तर तपासून घ्या,' असे म्हणत मजुरांना अॅडमिटही करून घेतले. काही कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या नातेवाइकांनाही अॅडमिट करून घेतल्याची चर्चा आहे.
भीतीपोटी जमवाजमव
शासनाकडूनकोट्यवधी रुपये खर्च करून आयुर्वेदिक रुग्णालय महाविद्यालय चालवण्यात येते. या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी असल्यास रुग्णालयाचे स्थलांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थलांतर होऊ नये, या हेतूने कर्मचाऱ्यांनी बोगस रुग्णांची जमवाजमव केल्याची चर्चा रुग्णालय परिसरात सुरू होती. रुग्णालय या ठिकाणीच रहावे, ही भूमिका योग्य असली तरी त्यासाठी मात्र, अवलंबलेला मार्ग चुकीचा असल्याचे म्हटले जात आहे.
कोण आहेत ते कर्मचारी?
बोगस रुग्ण जमा करण्याच्या कारनाम्यामुळे आयुर्वेदिक रुग्णालयाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या मजुरांना रुग्णालयात कोणी आणले? गवत काढायला लावता अॅडमिट कशासाठी करून घेतले? मजुरांची मजुरी का दिली नाही? यामध्ये संपूर्ण यंत्रणाच सहभागी आहे काय? आदी प्रश्न उपस्थित झाले असून, याची उत्तरे रुग्णालयप्रमुख म्हणून अधिष्ठात्यांना द्यावी लागणार आहेत. तसेच दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
चौकशी करणार
- येथील आयुर्वेदिक रुग्णालयात १७० बेडची क्षमता असून, विविध प्रमुख १२ विभाग कार्यरत आहेत. सध्या केंद्रस्तरावरील पथक तपासणीसाठी आले आहे. भाड्याने मजूर आणून त्यांना रुग्णालयात अॅडमिट केले किंवा कसे याची चौकशी करण्यात येईल. यात दोषी आढळल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.''
डॉ. प्रकाश खापर्डे, अधिष्ठाता, आयुर्वेदिक रुग्णालय.
आजार नसताना उपचार
- घाटंग्री येथून सकाळी काम मिळावे यासाठी शहरात आलो. नेहमीप्रमाणे चौकात थांबलो होतो. गवत काढण्यासाठी मला रुग्णालयात ३०० रुपयांवर मजुरीसाठी नेण्यात आले. परंतु, त्याठिकाणी तुमचे काही दुखत असल्यास तपासून घ्या, असे सांगितले. काही आजार नसताना अॅडमिट केले.''
सुखदेव जाधव, घाटंग्री.
- कामाच्या प्रतीक्षेत सकाळी 9 वाजता येथील भोगावती पुलाजवळ थांबले असता, आयुर्वेदिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गवत काढण्यासाठी म्हणून माझ्यासह अन्य जणांना रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी गवत काढण्याचे काम न देता थेट उपचारासाठी अॅडमिट करून घेतले. ३०० रुपये हजेरी देण्याचे ठरवले होते. ''
शेवंता राठोड, मजूर, जहागीरदारवाडी.