सेलू - सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये शुक्रवारी (दि.१३) जाहीर लिलावात शेतकऱ्यांच्या कापसाला जास्तीत जास्त ५८०८ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. या लिलावात कमीत कमी भाव ५१०६ रुपये व सरासरी भाव ५७११ रुपये मिळाला.
लिलावामध्ये कापूस खरेदीदार रामेश्वर राठी, गोपाळ काबरा, आशिष बिनायके, निर्मल भाई, लक्ष्मीनारायण करवा, प्रकाश खराबे, प्रदीप फायबर व रामस्वरूप राठी आदींनी कापूस खरेदी केला. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र डासाळकर, उपसभापती सुंदरराव गाडेकर, संचालक दिनकर वाघ व शिवाजी डख हे उपस्थित होते. परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी नऊ वाजेपूर्वी बाजार समितीच्या कापूस यार्डात कापूस विक्रीसाठी आणावा तसेच सोबत येताना बँक पासबुकची झेरॉक्सप्रत सोबत आणावी, जेणेकरून आपला धनादेश देणे सोयीस्कर ठरेल, असे आवाहन बाजार समितीचे सभापती डासाळकर यांनी केले.
शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू
-बाजार समितीच्या वतीने शासकीय तूर खरेदी सुरू झालेली आहे. त्यासाठी तुरीचा ओलावा १२ टक्क्यापर्यंतच असावा व हिरवे दाणे नसावेत. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा माल स्वच्छ करून व वाळवून विक्रीस आणावा. सोबत सातबारा व तुरीचे पेरा प्रमाणपत्र व बँक खात्याच्या पासबुकची झेरॅाक्स प्रत सोबत आणावी.
-रवींद्र डासाळकर, सभापती