आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांनो डोळे मिटून नव्हे, जागरूक राहून करा मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन : जिल्हाभरातील ग्रामपंचायतीचे कारभारी निवडण्यासाठी आज मतदान होत आहे. काही ठिकाणी उमेदवारांना वाढता पाठिंबा, पॅनलचे वर्चस्व, प्रभाग उमेदवारांचा प्रत्यक्ष भेटीवर भर, गल्लीबोळात हात जोडून मतदारांना लक्ष राहू द्याचा स्वर दोन दिवसांपासून मतदारांच्या कानात घुमत आहे.

उमेदवारांचे मतदारांसमोर नतमस्तक होताना कंबर व गुडघे थकले आहेत. गावोगावी सत्ताधारी आपले व पर्यायाने सत्तेतील अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत. आपणच गावाचा विकास करण्यास सक्षम असल्याचे मतदारांना पटवून सांगताना उमेदवारांची होणारी दमछाक रविवारी थांबली. त्यानंतर एसएमएस, व्हॉट‌्सअॅप व सोशल मीडियाच्या माध्यमातून यंदा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. लोकसभा व विधानसभेप्रमाणेच हायटेक प्रचाराचे फंडे ग्रामपंचायत निवडणुकीत वापरण्यात आल्याचे चित्र यंदा दिसून आले. यंदा दुष्काळातदेखील मोठ्या प्रमाणावर निवडणुकांत उधळपट्टी झाल्याचे दिसून आले. तर मतदानाच्या दिवसापर्यंत कार्यकर्ते आपल्याला सोडून जाऊ नये यासाठी, रोज संध्याकाळी त्यांना श्रमपरिहारासाठी हॉटले, धाब्यावर नेले जात होते. याशिवाय गावातील एकगठ्ठ मत असणाऱ्या कुटुंबावर सर्वच उमेदवारांचे बारकाईने लक्ष होते. योसठी त्या कुटुंबाचया समस्या सोडवण्यात उमेदवार पुढाकार घेत असल्याचेही चित्र पाहायला मिळाले. यंदा सरपंचपदावर आपलीच वर्णी लागावी यासाठी उमदेवारांनी साम, दाम अशा सर्व प्रकारे शक्ती पणाला लावली होती. तर काही मातब्बर उमेदवारांनी रात्रभरातून मतदार फोडण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचाही प्रयत्न् केला. यंदा काही भागात प्रचारादरम्यान फेरफटका मारला असता दुष्काळातही जनतेच्या चेहऱ्यावर सुकाळ असल्याचे दिसून आले. तर आज झालेल्या मतदानानंतर मतदारराजा कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतात व कुणाला सरपंचपदी विराजमान करतात हे येणारा काळच ठरवणार आहे.

प्रसंग १ मुंबई- नागपूर एक्स्प्रेस हायवेवरील अासेगाव हे छोटेसे गाव आहे. दुपारचे ३ वाजले होते. या वेळी रस्त्याशेजारील मळ्यात जाणाऱ्या येणाऱ्यांची लगबग होती. तरुण तुर्क म्हातारे अर्कपासून शालेय विद्यार्थी दोन्हीही पॅनलकडून तिकीट न मिळाल्यानेच नको कुठला पक्ष मी बरा अपक्ष म्हणत अापल्या प्रभागातील मतदारराजांच्या सोयीसाठी तीन बोकड्यांच्या कंदुरीचा बेत...मतदार असो नसो सर्वजण येथच्छ ताव मारत असल्याचे चित्र होते.
प्रसंग २ अपक्ष उमेदवाराने कंदुरीच्या बेताद्वारे मतदारांची केलेली सोय त्यांच्या विरोधातील पॅनलच्या अधिकृत उमेदवारांच्या चांगलीच जिव्हारी लागली. यावर शेरास सव्वाशेर म्हणत या उमेदवाराने चक्क पाच बोकडे कापले. त्याचे पाव-पाव किलो मटण सर्वांच्या घरी बिनबोभाट पार्सल केले. मग काय घरातील सर्वांसह बच्चे कंपनींचीदेखील चंगळ झाली.

प्रसंग ३ तळीरामांनी उमेदवारांना हैराण करून सोडले. हा समूह वाढतच चाललाय. नको नसते लचांड म्हणून त्या विजयाची खात्री असणाऱ्या उमेदवाराने लगेच सर्वांच्या हाती एकएक शंभराची नोट अन् सोबतीला देशी चपटीची भेट सोपवली. झिंगलेले मतदारांचे उमटले बोल.. कोरडा शिधा होय चपटीची सोय.

प्रसंग ४ अनेक गावांचे कारभारी शहरात राहतात. उंटावरून शेळ्या हाकण्याच्या या प्रकाराला वैतागत शहरातील सरपंच नको रे बाबा आता, ग्रामपंचायतचा देऊ गावातल्यांनाच ताबा असे म्हणत नवनिर्मितीचे शिलेदार बनण्याचा आव आणू लागले.

प्रसंग ५ वेळ दुपारी एक वाजता.. जुने औरंगाबाद- नाशिक महामार्गावरील माळीवाडा गाव.. महिलांची रॅली, पदयात्रा नुकतीच संपलेली, प्रत्यक्ष गृहभेटीवर उमेदवारांची चुलती कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह निघालेली. एका घरासमोर म्हातारी बसलेली. आजीबाई मतदान शिलाई मशीनलाच करायचं बरं. आपला पिंट्या उभा आहे. त्यावर म्हातारी वैतागून हे बघ बया.. जे बटण टायमावर दिसंल अन् मला जे पटंल त्यालाच मतदान देईन. उगच रिकाम डोक लावायचं नाय.
या प्रसंगातून म्हातारी जोमात तर चुलती कोमात.
प्रसंग ६ ज्यांना चपटी नाय मटण नाय त्यांना शिर्डी दर्शन. भावी सरपंचाचे प्रबळ दावेदार वयोवृद्ध व धार्मिक वृत्तीच्या मतदारांना सोमवारी तीन क्रुझर करून शिर्डी दर्शन घडवले. आज मतदानाच्या दिवशी पहाटेच अंघोळी करून साईचरणी नतमस्तक होत एव्हाना मतदानाला पोहोचले असतील.

‘दिव्य मराठी’चे सूज्ञ मतदारांना विनम्र आवाहन
प्रत्येक उमेदवार हा मतदारांना विकासाचे भव्य, दिव्य स्वप्न दाखवतो. तर काही उमेदवार विविध अामिषे, प्रलोभने. निवडणूक पार पडली व एकदाचे निवडून आले तर मग विकास , नंदनवन, प्रगती या सर्वांच्या नावानं चांगभलेच. लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी आपले प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांची ससेहोलपट थांबवण्यासाठी डोळे उघडे ठेवत अमूल्य मतदान करा.
बातम्या आणखी आहेत...