वैजापूर- तालुक्यात १०३ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल गुरुवारी जाहीर झाले असून आता सरपंच पदासाठी कुणाची वर्णी लागते याची सर्वत्र उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
निकाल लागल्यानंतर येथील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत आमच्याच पक्षातील समर्थकांची सरशी झाल्याचे दावे-प्रतिदावे करण्याचे शीतयुद्ध येथे रंगले आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेनेचे माजी आमदार आर.एम.वाणी यांनी ४८ ठिकाणी एकहाती शिवशाही पॅनलची सत्ता आल्याचा आकडा प्रसारमाध्यमांकडे निकालाच्या दिवशीच प्रसिद्धीसाठी दिला होता. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत ५७ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याचा दावा केला, तर दुसऱ्या बाजूने काँग्रेसचे नेते डॉ. दिनेश परदेशी यांनी ४७ ग्रामपंचायती काबीज केल्याचे स्पष्ट केले. मनसेनेही सात ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकल्याचा दावा केला आहे. वैजापुरात कोणत्या पक्षाच्या ताब्यात कोणती ग्रामपंचायत आली व तिथे किती सदस्य निवडून आले, याची निश्चित आकडेवारी कोणाकडे नाही.
सदस्य मेळाव्यात ताकद स्पष्ट होणार
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राजकीय पक्षांत बहुमतावरून कुरघोडी करण्याची चढाओढ रंगली आहे. त्यामुळे कोणत्या ग्रामपंचायतीत आपल्या पक्षाची एकहाती सता आली व सदस्य निवडून आले, याचा फैसला पक्षस्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य मेळाव्यातूनच स्पष्ट होणार आहे.