आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदय, अवयदानासाठी नांदेडात ग्रीन कॉरिडॉर; अवयव मुंबई-पुणे-औरंगाबादकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमानतळावरून ग्रीन कॅारिडॅार सुविधा देऊन हृदय  बुधवारी मुंबईकडे, तर यकृत पुण्याकडे रवाना करण्यात आले. छाया : विजय होकर्णे. - Divya Marathi
विमानतळावरून ग्रीन कॅारिडॅार सुविधा देऊन हृदय बुधवारी मुंबईकडे, तर यकृत पुण्याकडे रवाना करण्यात आले. छाया : विजय होकर्णे.
नांदेड - अवयवदान आणि या अवयवांच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर म्हणजे जलदगती सुविधा उपलब्ध करून देण्यात नांदेड यशस्वी झाले आहे. नांदेडच्या श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावरून हृदय मुंबईकडे, तर यकृत पुण्याकडे रवाना करण्यात आले. यानिमित्ताने विष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अवयवदानासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देत अवयव प्रत्यारोपणासाठी पाठवण्याची प्रक्रिया महानगरानंतर पहिल्यांदाच यशस्वी करून दाखवली. सुधीर रावळकर यांच्या अवयवांमुळे पाच जणांचे आयुष्य सावरले जाणार आहे. रावळकर कुटुंबीयांनी दाखविलेल्या धीरोदत्तपणामुळे आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे अवयव प्रत्यारोपित होणाऱ्यांच्या कुटुंबांना समाधान मिळणार आहे.

अवयवदान आणि अवयवाच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विविध यंत्रणांशी समन्वय साधला. ग्रीन कॉरिडॅारसाठी पोलिस यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, विमानतळाशी निगडित व्यवस्था आणि आरोग्य यंत्रणांना गतिमान केले. विष्णुपुरी ते विमानतळ हे अंतर विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या तेरा मिनिटांत पार करण्यात आले.

मुखेड तहसीलमधील रोहयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी सुधीर रावळकर यांचा नरसी-मुखेड रस्त्यावर अपघात झाला होता. रावळकर यांचा मेंदू-मृत झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे रावळकर यांच्या कुटुंबीयांना सावरण्याबरोबरच, जिल्हा प्रशासन आणि डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयाने अवयदान समंतिपत्रानुसार रावळकर यांच्या अवयवांचे दान करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याबाबत अवयदानाशी निगडित औरंगाबाद येथील विभागीय समितीशी संपर्क साधण्यात आला. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर बुधवारी सकाळी हृदय घेऊन जाण्यासाठी मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलचे हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे, डॉ. विजय शेट्टी, डॉ. संदीप सिन्हा, तर यकृत घेऊन जाण्यासाठी पुण्यातील रुबी हॅास्पिटलचे डॉ. कमलेश बोकील, मूत्रपिंड घेऊन जाण्यासाठी औरंगाबादच्या कमलनयन बजाज रुग्णालयाचे डॉ. अजय ओसवाल नांदेडमध्ये दाखल झाले.

डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. पी. टी. जमदाडे, डॉ. राजेश अंबुलगेकर, डॉ. श्रीधर येन्नावार, डॉ. नितीन नंदनवनकर, डॉ. डी. पी. भुरके, डॉ. एच. व्ही. गोडबोले यांनीही आरोग्य संकुलाच्या रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहे सज्ज ठेवली. दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी हृदय घेऊन डॉ. मुळे आणि त्यांचे सहकारी विमानतळाकडे रवाना झाले. अवघ्या तेरा मिनिटांत हा ताफा विमानतळावर पोहोचला आणि दोनच मिनिटात हृदय घेऊन विमान मुंबईकडे झेपावले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात यकृत घेऊन पुण्याचे पथक विमानाने रवान झाले, तर औरंगाबादचे पथक मूत्रपिंड घेऊन मोटारीने रवाना झाले.

अवयदान आणि प्रत्यारोपणासाठीच्या वैद्यकीय सज्जतेसाठी विष्णुपुरी आरोग्य संकुलातील शस्त्रक्रियागृहाशी निगडित वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी काल रात्रीपासून प्रयत्नशील होते, तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रीन कॉरिडॅारसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय येनपुरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे, महेंद्र पंडित, उपअधीक्षक अशोक बनकर यांच्याशी समन्वय साधला.
थँक्यू.. नांदेड... थँक्यू...!
हृदय घेऊन डॉ. मुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या लिफ्टमधून वाहनाकडे जाताना हात हलवून म्हणाले... थँक्यू नांदेड.. थँक्यू... त्यांचा विष्णुपुरी ते विमानतळ हा प्रवास केवळ तेरा मिनिटांत झाला. हृदयासह मुंबईकडे रवाना होतानाही डॉ. मुळे यांनी कृतज्ञतेपोटी हात हलवून निरोप घेतला.
बातम्या आणखी आहेत...