आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली जिल्हाभरात मतदारांचा संमिश्र कौल लोकसभा, विधानसभेप्रमाणे दाखवला उत्साह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- मतदान असो की त्यानंतरची मतमोजणी असो, जिल्ह्यातील मतदारांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत उत्साह दाखवला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जिल्हाभरात झालेल्या ४२३ ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रमुख पक्षांना संमिश्र प्रतिसाद दिला.
जिल्ह्यातील ४६५ पैकी ४२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यावर ४२३ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान झाले. मतमोजणीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाला मतदारांनी थोड्याफार फरकाने सारखाच प्रतिसाद दिल्याचे निकालावरून दिसून आले. निकाल लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये हिंगोली तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सेनगाव तालुक्यातील ७६, कळमनुरीतील ९१, औंढा नागनाथ ८६, तर वसमत तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. \\

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, शेवाळा, डोंगरकडासारख्या मोठ्या ग्रामपंचायतींवर काँग्रेसशी संबंधित पॅनलनी विजय मिळवला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे काँग्रेसची सत्ता आली आहे. जवळा बाजार येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या पॅनलला बहुमत मिळाले नसल्याने दोन इतर सदस्यांवर त्यांची मदार आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा शिवसेना-राष्ट्रवादीचा संयुक्त पॅनल आले असून गिरगाव राष्ट्रवादी, तर हट्टा काँग्रेसकडे गेले आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व स्थापले गेले असून पुसेगाव काँग्रेसकडे गेले आहे. हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका भाजपकडे आले आहे. इतर ठिकाणीही मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. पावसामुळे पाचही तहसील कार्यालयांत गुरुवारी सकाळी ९ ऐवजी १० च्या सुमारास मतमोजणीस सुरुवात झाली.
दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वच ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. नवनिर्वाचित सदस्य आणि मतदारांनी सकाळपासूनच तहसील कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. पावसात नागरिकांनी छत्र्या घेऊन निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
बातम्या आणखी आहेत...