आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली जगाच्या नकाशावर : तिसऱ्या लायगो प्रयोगशाळेसाठी जमीन खरेदीचे काम अंतिम टप्प्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
हिंगोली  - जगातील तिसऱ्या लायगो प्रयोग शाळेच्या उभारणीसाठी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून जमिनीचे मूल्यांकन काढून शेतकऱ्यांना बाजार भावाप्रमाणे किंमत देऊन लवकरच अधिग्रहण केले जाणार आहे. तसेच प्रयोग शाळेतील शास्त्रज्ञ मंडळींना निवासासाठी येथील एमआयडीसी भागात बांधकाम करण्यात येणार आहेत.  
 
औंढा नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी, दुधाळा शिवारात लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरी म्हणजेच ‘लायगो’ नावाची प्रयोगशाळेचे बांधकाम होणार आहे. या प्रयोगशाळा अमेरिकेतील लिव्हिंगस्टन (लुइसिनिया) आणि रिच लँड (वॉशिंग्टन) या ठिकाणी कार्यान्वित आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये अशी प्रयोगशाळा सुरू करण्याचे प्रयत्न झाले. परंतु तिसरी प्रयोगशाळा काही सुरू झाली नाही. आता जगातील तिसरी प्रयोगशाळा स्थापन होण्याचा मान भारताला आणि तेही महाराष्ट्र राज्य, हिंगोली जिल्ह्याला मिळाला आहे. त्यामुळे ही प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यास हिंगोली जिल्हा आणि औंढा नागनाथ जगाच्या नकाशावर नावारूपास जाणार आहे. या प्रयोगशाळेसाठी जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाली असली तरी विविध परवाने आणि शेतकऱ्यांची संमती मिळविणे बाकी होते. प्रकल्पाला लागणाऱ्या सुमारे १०० हेक्टर जमिनीपैकी सुमारे ७० टक्के जमीन सरकारी आहे. त्यामुळे सरकारी जमीन खरेदीचा प्रश्न मिटला असला तरी शेतकऱ्यांची जमीन खरेदी करणे शिल्लक आहे. या जमिनीला बाजारभाव प्रमाणे दर देण्याचे निश्चित झाल्यानंतर आता हा प्रश्नही आता निकाली निघाला आहे. तसेच या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांची जागाही निश्चित झाली आहे. औंढा किंवा हिंगोली अशा दोन जागा निश्चित होणार होत्या. त्यापैकी हिंगोली येथील एमआयडीसी भागातील आयटीआयच्या जवळची मोकळी जागा आता निश्चित झाली असून त्या ठिकाणी निवासस्थाने बांधली जाणार आहेत. सुमारे १३०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.
 
भूकंप धक्क्यांचा लायगोला धक्का नाही  
औंढा नागनाथ येथून जवळच असलेल्या पांगरा शिंदे भागात गेल्या १५ दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. लातूरच्या भूकंप मापन प्रयोगशाळेत या धक्क्याची नोंदही झाली आहे. लायगो प्रयोगशाळेचे काम केवळ एक निरीक्षणापर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे भूकंप धक्क्यांचा लायगो प्रयोग शाळेला काही धोका नाही. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमीन संपादनाची प्राथमिक प्रक्रिया आता जवळपास पूर्ण झाली असून शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान उभारणीचा प्रश्नही निकाली लागला आहे. हिंगोली येथील एमआयडीसी भागात आता ही निवासस्थाने उभारली जाणार आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...