आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहिदांच्या स्मृतीस उजाळा देत पाच दिवस रंगते धारूरची होळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर- ‘तुम जिओ तो खेले फिर होली, सदा आनंद रहे द्वार, मोहन खेले होली हो’, ‘पापासिंगने नाम किया, एक धर्मवीर बलिदान हुआ’ अशा स्फूर्तीची  गाणी गात  शहिदांच्या स्मृतीला उजाळा देणारी अनोखी होळी राजपूत समाजाकडून धारूर शहरामध्ये साजरी करण्यात येते.  पाच दिवस चालणाऱ्या या होळीत रंगाबरोबर गुलालाची उधळण केली जाते.   

प्रत्येक दिवशी एका कुटुंंबाकडून रंगांची उधळण करण्यात येते. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून शहरात ढोलकी, झांजाच्या सुरावर काढण्यात येणारी चाचर या पर्वातील महत्त्वाचे अाकर्षण असते. पाच दिवस रंगाेत्सव साजरा हाेणारे धारूर शहर जिल्ह्यातील एकमेव अाहे.  
  
धारूरला ज्याप्रमाणे एेतिहासिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे होळी सणालाही जुनी परंपरा आहे. हा सण राजपूत समाजात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. होळी पौर्णिमेच्या दीड महिना अगोदर वसंतपंचमी हा सण असतो. तेव्हापासून राजपूत समाजाच्या वतीने कटघरपुरा भागातील हनुमान मंदिरासमोर होळी गीतांना सुरुवात होते. सोमवार व शुक्रवारी रात्रीच्या वेळी दहा ते दोन वाजेच्या दरम्यान ही गीते गायली जातात. वीररसाच्या गाण्यांसह देशभक्तिपर, कलात्मक, भक्तिगीतांचा यात समावेश असतो. होळीच्या दिवशी सर्व परिवार एकत्र येऊन होळी पेटविली जाते.  

काही वेळ रंगाची उधळण होते. नंतर रात्री उशिरापर्यंत गाणी गायली जातात. होळी सणाला येथील कुटुंबांचे नातेवाईक  एकत्र येतात. धूलिवंदनापासून रंगपंचमीपर्यंत चाचर काढण्यात येते. चाचर म्हणजे सामुदायिक फेरी. यात राजपूत बांधव समाजाची परंपरा सांगणारी गीते गातात. ‘प्रथम सदा आनंद रहे रे द्वार, मोहन खेले होली हो’ असे म्हणत परिसरात दिसेल त्याच्यावर रंगांची उधळण केली जाते. रंग उधळण्याचे काम दरदिवशी एका कुटुंबाकडून केले जाते.   

पहिल्या दिवशी दुबे, दुसऱ्या दिवशी तिवारी, तिसऱ्या दिवशी मिश्रा, चौथ्या दिवशी हजारी व पाचव्या दिवशी सद्दीवाल कुटुंबाचा समावेश असतो. या पर्वात येणाऱ्या  जावयाला  गाढवावर मिरवणूक काढण्यात येते. रात्रीच्या वेळी काढण्यात येणाऱ्या चाचरीत रंगाएेवजी गुलालाची उधळण केली जाते. येथील बालाजी मंदिरात चाचरचा शेवट होताे. सायंकाळी दूध व इतर पदार्थांच्या मिश्रणापासून तयार केलेली ‘ठंडाई’ पिण्यासाठी इतर समाजालाही अगत्याने निमंत्रित केले जाते. रंगमंचमीच्या दिवशी रात्रीची चाचर उशिरापर्यंत चालू असते. शहरातील अकरा मंदिरात जाऊन आरती केली जाते. या सणास सर्वजण नवीन कपडे परिधान करतात.   

शहिदांच्या स्मृतीला उजाळा   
साेळाव्या शतकापासून राजपूत समाजाकडून  होळीचा सण साजरा केला जातो. हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून ही होळी पेटविण्यात येते. निझाम राजवटीत येथे होळी पेटविण्यास मज्जाव केला होता.  त्या वेळी होळी पेटविली म्हणून मोठी दंगल झाली होती. यात येथील पापासिंह शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतीस उजाळा म्हणून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.   
- रूपेश हजारी, सामाजिक कार्यकर्ते, धारूर.
बातम्या आणखी आहेत...