आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेहाची अवहेलना केल्यास फाैजदारी कारवाई शक्य; पण कायद्याच्या बडग्यापेक्षा माणुसकी जपणे महत्त्वाचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 बीड  - राेटरी क्लबचे पदाधिकारी उदय काटे यांचे अाजारपणामुळे अाैरंगाबादेतील रुग्णालयात निधन झाले. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह बीडला नेण्यात अाला, मात्र ते राहत असलेल्या निवासस्थानी हा मृतदेह अाणण्यास अपार्टमेंटमधील रहिवाशांनी विराेध केल्याचे प्रकरण दाेन दिवसांपूर्वी घडले. लहान मुले घाबरतील, घरांची वास्तुशांती झालेली नाही, अशी कारणे देत हा विराेध करण्यात अाला.
 
मात्र शेजाऱ्यांनी घेतलेल्या या असंवेदनशील भूमिकेचा सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त हाेत अाहे. अखेर प्रकरण पाेलिसांपर्यंत जाण्याच्या धास्तीमुळे या नागरिकांनी अपार्टमेंटमध्ये मृतदेह अाणण्याची परवानगी दिली असली तरी त्यांच्या या मानसिकतेबाबत तीव्र संताप व्यक्त हाेत अाहे. 
 
साेशल मीडियातूनही त्याचे पडसाद उमटत अाहेत. दरम्यान, अशा प्रसंगात कायद्यापेक्षा माणुसकीची चौकट महत्त्वाची असून माणुसकीचा गहिवर आटतोय आणि शेजारधर्माची संस्कृतीही ‘फ्लॅट’ हाेत असल्याचे मत वकील, पोलिस अधिकारी व नागरिकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.   
 
उदय काटे यांचे सोमवारी कर्करोगाने निधन झाले. त्यांचा मृतदेह ते राहत असलेल्या बीडमधील जवाहर काॅलनी भागातील सिद्धिविनायक प्राइड अपार्टमेंटमध्ये नेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. मात्र या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुशिक्षित लाेकांनी त्यास विराेध दर्शवला. ‘आमची मुले घाबरतील, घरांची वास्तुशांती झालेली नाही’ अशी कारणे  त्यासाठी देण्यात अाली. मुख्य प्रवेशद्वाराला कुलूपही ठाेकण्याचा निर्दयीपणा त्यांनी दाखवला. दु:खात असलेल्या काटे कुटुंबीयांच्या मित्र परिवाराने शेजाऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र ते एेकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

पाेलिसांत जाण्याचा इशारा दिल्यानंतर मात्र हे लाेक वठणीवर अाले व उदय यांच्या पार्थिवावर रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात अाले. दरम्यान, या घटनेबाबत साेशल मीडियात चर्चा हाेत असून संतापही व्यक्त केला जात अाहे. दरम्यान, अपार्टमेंट कायदा, सोसायटीचे नियम  आणि अशा प्रसंगात प्रकरण पाेलिस ठाण्यापर्यंत गेलेच तर पोलिसांची भूमिका याबाबत ‘दिव्य मराठी’ने काही तज्ज्ञांशी चर्चा केली.
 
बीडमध्ये उदय काटेंचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये आणण्यास विरोध केल्याप्रकरणी संतप्त भावना 
माणुसकीशून्य सुशिक्षित
या सोसायटीतील सर्वच लोक उच्चशिक्षित, नोकरदार आहेत. तरीही माणुसकीशून्य प्रकार घडला. या घटनेबाबत सोशल  मीडियातूनही संताप व्यक्त हाेत अाहे. शिकलेल्या माणसांत माणुसकी हरवत चालली असल्याचे मत अंबाजोगाईतील दगडू लोमटे यांनी व्यक्त केले, तर अशा लोकांना कायद्यानेच अद्दल घडवली पाहिजे, असे सोनल पाटील यांना वाटते. शिक्षणाने प्रगत होणारा माणूस संवेदनाशून्य होत असल्याची खंत प्रा. अनिता शिंदे यांनी व्यक्त केली.
 
वास्तुशांती अन् मृतदेहाचा संबंध नाही : वास्तुशांती विधी झालेला नसेल तर त्या घरी मृतदेह आणू नये असाही नियम कोणत्याही शास्त्रात नाही. जन्म, मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. ती कुठेही होऊ शकते. त्यामुळे असा नियम शास्त्रात नसल्याचे बीडमधील पुरोहितांचे मत अाहे. 
 
कायदा काय सांगताे?  
महाराष्ट्र अपार्टमेंट कायदा १९७० हा दुरुस्ती झालेला आहे. यामध्ये अपार्टमेंटच्या व्यवस्थापन, घर भाड्याने देण्याबाबतचे नियम आहेत. सोसायटीचे अध्यक्ष, सचिव ठरवतील ते नियम सदनिका धारकांना पाळावे लागतात. पण मृतदेह सोसायटीत अाणू नये हा नियम कुठेच नाही. सुख-दु:खाच्या प्रसंगात साेसायटीतील लाेकांनी काय करावे यासाठी ‘सामाजिक सद् भाव’ शिक्षणाची गरज या निमित्ताने पुन्हा निर्माण झाली अाहे.  
 
१ वर्षाच्या शिक्षेची तरतूद   
- कलम २९७ नुसार मृतदेहाची विटंबना, हेळसांड केल्यास एक वर्षाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही हाेऊ शकते.अपार्टमेंट कायद्यात याबाबत तरतूद नसल्याने माणुसकीच्या पातळीवर सकारात्मक विचार महत्त्वाचा अाहे.  अॅड. विलास सावंत, हायकोर्ट खंडपीठ, औरंगाबाद
  
हेळसांड करणे गुन्हाच  
- मृतदेहाची हेळसांड करणे, विटंबना करणे, अडवणे, अंत्यसंस्कार राेखणे हा गुन्हा आहे. नागरिकांनी विरोध केल्याच्या प्रकारातही मृतदेहाची हेळसांड होत असेल तर भारतीय दंड विधान कलम २९७ नुसार अशा प्रकरणांमध्ये संबंधितांवर गुन्ह्याची नोंद केली जाऊ शकते. गणेश गावडे, पोलिस उपअधीक्षक, बीड   
 
बीडमधील प्रकार अवैज्ञानिक, अमानवी  
- वास्तुशांती न झाल्यामुळे एखाद्याचा मृतदेह घरी न आणणे हे अवैज्ञानिक तर आहेच; पण अमानवीही आहे. वास्तुशांती झालेल्या घरात काही अरिष्टच घडत नाही असे नाही. झालेला प्रकार निंदनीय अाहे.  प्राचार्य सविता शेटे, राज्य कार्यकारिणी सदस्य, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बीड. 

 
बातम्या आणखी आहेत...