आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा गर्भपात प्रकरण: म्हैसाळ प्रकरणाचा तपास महिला अधिकाऱ्यांकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - म्हैसाळ येथील भारती हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात व भ्रूणहत्या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. ही घटना अतिशय दुःखद, वेदनादायी आणि संतापजनक आहे. यातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल तसेच या प्रकरणाचा तपास वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दीपाली काळे यांच्याकडे सोपवण्यात येत आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी  कायद्याच्या माध्यमातून एक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. मात्र, आई-वडिलांनीही मुलीचा जन्म घेण्याचा अधिकार हिरावून घेऊ नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी  केले.  
 
म्हैसाळ येथील भारती हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात व भ्रूणहत्येबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात  बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची उपस्थिती होती.   
 
या वेळी पंकजा मुंडे आणि सुभाष देशमुख यांनी घटनेचा सविस्तर आढावा घेतला. म्हैसाळ घटनेची संपूर्ण माहिती, आतापर्यंत केलेली कारवाई, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.  
 
मुंडे म्हणाल्या, म्हैसाळ प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी डॉ. दीपाली काळे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात येत आहे. त्यामुळे तपासाला आणखी चांगली गती व दिशा मिळेल. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निदान प्रतिबंध) (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या माध्यमातून मोहीम हाती घेण्यात येईल. त्याअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी, महसूल आणि पोलिस यंत्रणा यांचे पथक तयार करून प्रत्येक तालुक्यामध्ये अशा घटना रोखण्यासाठी पाऊल उचलले जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...