आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोलवर बोअर घेण्यामुळे लातूर जिल्ह्यात जमिनीची झाली चाळण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - अत्यल्प पावसामुळे भूजलपातळी खालावल्यामुळे ४०० फुटांपर्यंतचे बोअर कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात दररोज किमान १०० बोअर घेतले जात असून जमिनीची अक्षरश चाळण होत आहे. कायद्यानुसार २०० फुटांपर्यंतच बोअर घ्यायला परवानगी असतानाही आठशे फुटांपर्यंत घेतल्या जाणाऱ्या बोअरकडे जिल्हा प्रशासन सोयीस्करपणे डोळेझाक करीत आहे.

लातूर जिल्ह्यात या वर्षी ४५० मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या निम्मा पाऊस पडला असला तरी केवळ एक ते दोनच मोठे पाऊस झाले आहेत. त्यातही सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे सरासरी वाढली. प्रत्यक्षात या वर्षी पाऊस नसल्यामुळे जमिनीतील पाणीपातळी खालावली. लातूर जिल्ह्यातील पाणीपातळी साडेतीन मीटरने खालावल्याचा अहवाल भूजल विभागाने दिला आहे. मोठ्या धरणांतील पाणीसाठा संपत चालल्यामुळे नळांद्वारे होणारा पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांनी जाहीर केले आहे. लातूर शहराला सध्या पंधरा दिवसाला एकदा पाणी सोडले जात आहे. पुढच्या महिन्यापासून पाणी देता येणार नसल्याचे महापौरांनीच जाहीर केले आहे. उदगीर शहराचीही तीच अवस्था आहे. ग्रामीण भागात अतिउपशामुळे दिवाळीपासूनच टंचाईची तीव्रता वाढली आहे. पाणीपुरवठ्याची सार्वजनिक वितरण सेवा कोलमडल्यामुळे प्रत्येक जण आपापले जलस्राेत शोधण्याच्या कामात गुंतला आहे. त्याचाच परिणाम म्हणून बोअर घेण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र आहे. सध्या लातूर शहरातील ४०० फूट खोलपर्यंत असलेले बोअर कोरडे पडले आहेत. त्यामुळे ८०० फुटांपर्यंत खोल बोअर घेतले जात आहेत. नव्याने केलेल्या भूजल अधिनियमानुसार केवळ २०० फुटांपर्यंतच बोअर घेण्याचा नियम आहे. मात्र, तो सर्रास डावलला जात आहे.

जमिनीत पाणी नाही, नुसताच उडतो धुरळा
९० टक्के बोअरला पाणी लागत नाही अशी स्थिती आहे. पाचशे फुटांपर्यंत नुसताच धुरळा उडत आहे, अशी माहिती बोअर पाडणाऱ्या मशीनचे चालक सांगतात. मात्र, जागा मालकाच्या आग्रहापोटी जास्तीत जास्त खोल बोअर पाडले जात आहेत.

एकही कारवाई नाही
दोनशे फुटांखालील बोअर घेणाऱ्या एकावरही कारवाई झाली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे कोणत्याही ठाण्यात याबाबत एकही तक्रार आलेली नाही. तसेच तहसीलदारांकडेही तक्रार आलेली नाही. त्यामुळे याबाबत कारवाई झालेली नसल्याचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

दोनशे फुटांखालील पाणी घातक
दोनशे फुटांखालील पाण्यामध्ये विविध रसायनांचा समावेश होतो. त्यातील क्षारही वाढतात. त्यामुळे हे पाणी पिण्यास लायक नसते असे भूजल तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, पाणीच उपलब्ध नसल्यामुळे दोनशेच काय आठशे फुटांपर्यंतचे पाणी उपसून ते वापरण्याकडे लोकांचा कल आहे.