आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधारी पक्षात इनकमिंग: जि.प. निवडणुकीच्या तोंडावर अहमदपूरचे आमदार भाजपत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर अहमदपूरचे अपक्ष आमदार विनायक पाटील आपल्या समर्थक नगराध्यक्षा, नगरसेवक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्यांसह भाजपत प्रवेश करत आहेत. गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत सकाळी बैठक होऊन दुपारच्या सत्रात पक्ष कार्यालयात प्रवेश होणार आहे.  

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विनायक पाटील अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. सन १९९९ मध्येही अपक्ष म्हणून निवडून आलेल्या पाटील यांनी त्या वेळी राज्यमंत्रिपद सांभाळले होते. गेल्या विधानसभेला ते राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटील यांचा पराभव करून निवडून आले होते. विनायक पाटील मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी शहरासह ग्रामीण भागात चांगलेच बस्तान बसवले आहे. तीन जिल्हा परिषद सदस्य, काही ग्रामपंचायती ताब्यात असतानाच गेल्या महिन्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत त्यांनी आघाडी स्थापन केली. या आघाडीच्या अश्विनी कासनाळे या अध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यामुळे शहरातही विनायक पाटील यांचे वजन असल्याचे सिद्ध झाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून निलंगेकरांनी विनायक पाटलांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून त्यांना भाजपात येण्याचे आमंत्रण दिले. काही अटी आणि शर्ती ठेवून विनायक पाटलांनी भाजपचे आमंत्रण स्वीकारले आहे. यामुळे अहमदपूर-चाकूर तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या ११ जागांवर भाजपला बळ मिळणार आहे. आमदार विनायक पाटील यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी याला दुजोरा दिला असून शुक्रवारी प्रवेशाची तारीख पक्की झाल्याचे सांगितले आहे.
 
अॅड. जाधव यांचे विश्वासू राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
हिंगोली  | किन्होळा येथील भाजपचे ज्येष्ठ नेते व टोकाईचे चेअरमन अॅड. शिवाजी जाधव यांचे विश्वासू छत्रपती जाधव यांनी मंगळवारी माजी मंत्री   जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. वसमत तालुक्यातील किन्होळा येथे १० जानेवारी रोजी सकाळी ११   वाजता रमेशराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात टोकाईचे माजी संचालक छत्रपती जाधवसह वसंत नरवाडे कोठारीकर, शिवाजी जाधव, चिमणाजी जाधव, हनुमान जाधव यांच्यासह कौठा, बोराळा येथील स्थानिक नेत्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते सर्व कार्यकर्ते, नेत्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पूर्णा कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र महागावकर, संचालक बापूराव बेले, कृउबा सभापती राजू नवघरे, उपसभापती तानाजी बेंडे, सूतगिरणीचे अध्यक्ष प्रल्हाद राखोंडे, रा.काँ. तालुका अध्यक्ष देवीदास कऱ्हाळे आदी उपस्थित होते. भाजप नेते अॅड. शिवाजी जाधव यांनी गत विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात ५० हजार मतांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न गतिमान केले; परंतु झेडपी निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे सहकारी पक्ष सोडून गेले आहेत.
 
मुंडे गट निष्प्रभ  
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात पक्षाची मोर्चेबांधणी करताना थेट संपर्क असणारे नेते-कार्यकर्ते जोडण्यावर भर दिल्याचे यावरून दिसते. प्रारंभापासून अहमदपूर तालुका गोपीनाथ मुंडे यांच्या प्रभावाखाली आहे. पंकजा मुंडे यांच्याशी जवळीक असलेले अहमदपूरमध्ये भाजपचे नेतृत्व करणारे अशोक केंद्रे, प्रदेश प्रवक्ते असलेले गणेश केंद्रे विनायक पाटील यांच्या भाजप प्रवेशासाठी अनुकूल नाहीत. पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे अहमदपुरातील पंकजा मुंडे समर्थकांचा गट निष्प्रभ होणार आहे. 
 
भोसलेंच्या चर्चेने उदगीरमध्ये संभ्रम
उदगीरमध्येही बड्या नेत्यांचे भाजपत इनकमिंग होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. जनता दल, राष्ट्रवादी करून सध्या काँग्रेसमध्ये स्थिरावलेले चंद्रशेखर भोसले यांनी पालकमंत्री संभाजी निलंगेकर यांची भेट घेऊन भाजपात येण्याची इच्छा व्यक्त केल्याची पोस्ट सोशल मीडियात फिरत आहे. त्यामुळे हादरलेल्या भाजप नेत्यांनी तातडीने बैठक घेऊन त्यांना भाजपत प्रवेश दिल्यास आम्ही पक्ष सोडू, असा पवित्रा घेतला आहे. याबाबत भाजपचे विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांना विचारणा केली असता ती चर्चा मीही ऐकली आहे, पण ज्यांना जनतेने नाकारले आहे त्यांना सत्तारूढ पक्षात प्रवेश कसा द्यायचा? असा सवाल विचारला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उदगीरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला असून भोसले-निटुरेंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा पराभव झाला आहे. दरम्यान, याबाबत चंद्रशेखर भोसले यांच्याकडे विचारणा केली असता मी काँग्रेसमध्येच असून कुणाचीही भेट घेतलेली नाही. कुण्या पक्षात जाण्याचाही प्रश्न नाही, असे ते म्हणाले.