आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्रायणीच्या पवित्र जलधारांनी सुवासिनींनी केले मंदिर स्वच्छ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला सोमवारी (दि. ९) जलयात्रा उत्साही वातावरणात पार पडली. या वेळी हजारो सुवासिनींनी डोक्यावर वाजत-गाजत आणलेल्या इंद्रायणीच्या पवित्र जलधारांनी तुळजाभवानी मंदिर स्वच्छ धुऊन काढण्यात आले. त्यानंतर दुपारी देवीच्या सिंहासनावर शेषशायी अलंकार पूजा मांडण्यात आली.

तुळजापूर येथील पापनाश तीर्थ येथून सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मुख्य यजमान महंत तुकोजीबुवांच्या हस्ते इंद्रायणीच्या जलकलशाचे पूजन करण्यात येऊन जलयात्रेला प्रारंभ झाला. या वेळी मंदिर संस्थानचे शासकीय उपाध्ये सुमीत (बंडू) पाठक, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, तहसीलदार दिनेश झांपले, तहसीलदार सुजीत नरहरे, मुख्याधिकारी राजीव बुबणे, महंत हमरोजीबुवा आदींची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक, भवानी रोड मार्गे दुपारी १२.३० वाजता जलयात्रा तुळजाभवानी मंदिरात पोहोचली. मंदिर संस्थानच्या वतीने सुवासिनींची खना-नारळाने ओटी भरण्यात आली. संबळाचा कडकडाटात आराधी, गोंधळी संबळाच्या कडकडाटात व सनई चौघड्याच्या मंजुळ निनादात जलयात्रेत सहभागी वारुवाले, गोंधळी, आराधी मंडळ तसेच तरुणाई बेभान होऊन नाचत होती. 
या वेळी घोड्यावर स्वार मावळे उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. दुपारी १.३० वाजता अभिषेक पूजेला प्रारंभ झाला. या वेळी मानकऱ्यांचे सिंहासनासह दह्या, दुधाचे अभिषेक पार पडले. जलयात्रेमुळे सोमवारची सकाळी पूजा जलयात्रेनंतर झाली. ४.३० वाजता अभिषेक पूजा 
संपल्यावर देवीला महावस्त्र अलंकार घालण्यात आले.
 
शेषशायी अलंकार महापूजा उत्साहात
शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेदिवशी सोमवारी देवीची शेषशायीअलंकार पूजा मांडण्यात आली होती. शेषनागावर स्वार तुळजाभवानी देवीचे रूप सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शनाला खुले होते. रात्रीच्या अभिषेक पूजेनंतर १०.३० वाजता तुळजाभवानीची छबिना मिरवणूक काढण्यात आली.