आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाध्यक्ष निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी निरीक्षकांची गाडी अडवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी गुरुवारी राम पाटील रातोळीकर यांची निवड झाल्यानंतर पक्ष निरीक्षकांना कार्यकर्त्यांच्या संतप्त भावनांना सामोरे जावे लागले. कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या गाडीला घेराव घालून आपल्या भावना व्यक्त केल्या.
भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी श्रावण पाटील भिलवंडे हे सशक्त दावेदार होते. आमदार वसंत चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात त्यांनी भाजपचे रोपटे रुजविले, वाढविले. त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळाले असते तर काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणे सोपे गेले असते, अशा भाजप कार्यकर्त्यांच्या भावना होत्या. राजेश पवार हेही याच पदासाठी दावेदार होते. त्यांचेही कार्यक्षेत्र नायगावच आहे; परंतु पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करत राम पाटील रातोळीकरांनाच पुन्हा संधी दिली.
निवड झाल्यानंतर नागनाथ अण्णा निडवदे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, राम पाटील, चैतन्यबापू देशमुख, डॉ. अजित गोपछडे ज्या गाडीतून जात होते त्याच गाडीला संतप्त कार्यकर्त्यांनी घेराव घातला. ज्या जिल्हाध्यक्षाच्या गावातील ग्रामपंचायतही भाजप जिंकू शकला नाही त्याला पुन्हा संधी कशासाठी, असा रोखठोक सवाल कार्यकर्ते विचारत होते. अखेर चैतन्यबापू देशमुख, अजित गोपछडे, संजय कौडगे यांनी गाडीतून उतरून कार्यकर्त्यांना शांत केले.

पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या भावना योग्यरीतीने व्यक्त कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.
जिल्हाध्यक्षपदी राम पाटील रातोळीकरांची फेरनिवड
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर भारतीय जनता पक्षाने नव्या-जुन्यांची नाराजी दूर करत अखेर जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षाची गुरुवारी निवड केली. जिल्हाध्यक्षपदी राम पाटील रातोळीकरांची फेरनिवड करण्यात आली. महानगराध्यक्षपदी संतुकराव हंबर्डे यांची निवड करण्यात आली. महानगराध्यक्षपदासाठी गुरुवारी सकाळी लोकमान्य मंगल कार्यालयात बैठक झाली. लातूर ग्रामीण भाजपाध्यक्ष एकनाथराव जाधव, मराठवाड्याचे संघटक रेणुकादासराव देशमुख या वेळी निरीक्षक म्हणून उपस्थित होते. महानगराध्यक्षपदासाठी निष्ठावंतांपैकी प्रवीण साले, चैतन्यबापू देशमुख, डॉ. धनाजीराव देशमुख इच्छुक होते. नव्याने पक्षात आलेले दिलीप कंदकुर्ते, संतुकराव हंबर्डे, ओमप्रकाश पोकर्णा इच्छुक होते.