आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जब्बार पटेल यांनी जागवल्या ‘सिंहासन’ च्या आठवणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - "सिंहासन' या राजकारणावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाचे चित्रीकरण विधिमंडळ परिसरात करायचे, असे आम्ही ठरवल्यानंतर त्याविषयी शरद पवार यांच्याकडे मी परवानगी मागितली. त्याला पवारांनी परवानगीही दिली, पण ती देतानाच चित्रीकरणाविषयीची ही बाब एकदा यशवंतरावांच्याही कानी घाला, असे मला त्यांनी सुचवले. त्यानुसार यशवंतरावांना त्याची माहिती दिली. यशवंतरावांनी मला सिनेमातून लोकशाहीवर गदा येईल असे काही करू नका, असा सल्ला देऊन चित्रीकरणाला शुभेच्छा दिल्या, असा "सिंहासन' या गाजलेल्या चित्रपटाच्या आठवणींचा पट ज्येष्ठ नाट्य-चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी येथे उलगडून दाखवला.
अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे मार्गदर्शक तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्काराने ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी "सिंहासन' या चित्रपटाच्या अनेक अाठवणी येथे जाग्या केल्या. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी शरद पवार यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध कामी आले. आम्हाला विधानमंडळ, मंत्रालय, विधान परिषद, सचिवालय अशा ठिकाणी चित्रीकरण करायचे होते. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर परवानगीची गरज होती. त्यासाठी पवार यांनी मैत्रीपूर्ण संबंधाच्या विश्वासातूनच परवानगी दिली. त्यामुळे चित्रपट लवकर पूर्ण होऊ शकला. याशिवाय शरद पवार यांच्यासाठी यशवंतराव चव्हाणांचे स्थान, याचाही अनुभव चित्रीकरणाच्या निमित्ताने आला, असेही पटेल यांनी याप्रसंगी सांगितले.
पटेल यांनी ना. धों. महानोर यांच्या कवितेवरही भाष्य केले. वयाच्या १७ व्या वर्षी महानाेर यांनी कविता लिहायला सुरुवात केली. त्यांच्या कवितेवर यशवंतरावही फिदा असायचे.
यशवंतरावांविषयीच्या आठवणी सांगताना पटेल म्हणाले, अाजच्या जलयुक्त शिवारचा आराखडा यशवंतरावांनी तयार केला होता. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतरावांनीच रचला. मुख्यमंत्री ते देशाचे अर्थ, गृह, संरक्षण, परराष्ट्र मंत्र्यांसह उपपंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास आदर्श निर्माण करणारा आहे. यशवंतराव यांचे निधन झाले, तेव्हा त्यांच्या बँक खात्यावर फक्त एक लाख रुपये होते. मात्र, ग्रंथालयात १६ हजार पुस्तके होती. यशवंतरावांचा वारसा भगवानराव लोमटे यांनी तेवत ठेवला आहे, असेही ते म्हणाले.

साहित्य क्षेत्रातही राजकारण
साहित्य हे समाजात घडणाऱ्या घटनांचे वास्तव मांडण्याचे व्यासपीठ अाहे. मात्र, दुर्दैवाने याही क्षेत्रात राजकारणाचा शिरकाव झाल्याची खंत पटेल यांनी व्यक्त केली. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीतही राजकारण होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यसभेची संधी हुकली : महानोर
पुरस्कार स्वीकारल्यानंतर कवी ना. धों. महानोर यांनीही आठवणी सांगितल्या. दोन वेळा विधान परिषद सदस्य होण्याच्या संधीसोबतच राज्यसभेतही पाठवण्याविषयी विचार झाला होता, ही संधी मात्र दोन नेत्यांच्या वेगवेगळ्या मतांमुळे हुकल्याचे महानोर यांनी सांगितले.