आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदगीरमध्ये पळवून नेऊन खून; उपोषणाच्या प्रकरणाशी धागा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - उदगीर येथे मंगळवारी रात्री  पळवून नेऊन तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी उदगीर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवड्यापूर्वी उदगीरमध्ये उपोषणकर्त्यांचा मंडप जाळल्याच्या घटनेशी हे प्रकरण जुळत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. 
 
विजयकुमार बळीराम मसुरे (४०) असे मृताचे तर शिवकुमार झटिंगराव कांबळे, असे आरोपीचे नाव आहे. विजयकुमार हा मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उदगीर येथील दूरसंचार कार्यालयाजवळ आपला मित्र अविनाश अशोक वाघमारे याच्यासोबत बोलत उभा होता. त्या वेळी एक इंडिका कार आली आणि त्यातील तिघांनी विजयकुमारला कारमध्ये कोंबले.
 
 कार उदगीर तालुक्यातील तिवटघाळ शिवारात नेण्यात आली आणि विजयकुमारचा दगडांनी ठेचून खून करण्यात आला. तत्पूर्वी विजयकुमारला कारमध्ये काेंबताच त्याचा मित्र  अविनाश वाघमारे यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर रात्रीच तिघांवर विजयकुमारला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  
 
दरम्यान, बुधवारी सकाळी विजयकुमारचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणला. त्या वेळी मोठा जमाव एकत्रित आला आणि तणावाचे वातावरण बनले. मृताच्या नातेवाइकांनी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. परंतु पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची ग्वाही दिल्यानंतर वातावरण निवळले आणि मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  
 
नेमके प्रकरण काय?    
उदगीरमध्ये सिद्धार्थ इंडस्ट्रियल को-ऑप. सोसायटी असून त्याचा चेअरमन शिवकुमार कांबळे आहे. या सोसायटीत दोन कोटी ८० लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सविता बिरादार, माया शिंदे आदींनी उपोषण केले होते. १६ फेब्रुवारी रात्री उपोषणकर्त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यात गादी, चादरी जळाले. त्यानंतर उपोषणकर्त्या सविता बिरादार यांनी फिर्याद दिल्यानंतर शिवकुमार कांबळे व अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला होता.   
 
‘फूस’चा संशय  
हे उपोषण मृत विजयकुमार मसुरेच्या सांगण्यावरून  सुरू झाले होते, असा संशय आरोपी शिवकुमारला होता. त्यातून हे हत्याकांड घडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. परंतु अद्याप तशी ठाणे डायरीत नोंद करण्यात आली नाही. रात्री उशिरापर्यंत पळवून नेल्याच्या गुन्ह्यातच ३०२ कलमाचा समावेश करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक भीमाशंकर हिरमुखे यांनी सांगितले.  
 
लातुरातून कार जप्त   
खून प्रकरणातील आरोपी शिवकुमार कांबळे याची कार (एमएच २४ व्ही ६८१७) लातूरमध्ये पोलिसांनी त्याच्या एका मित्राच्या घरापासून जप्त केली आहे. या कारमध्ये रक्त लागलेल्या काठ्या आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...