आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकालातून लातूरमध्ये लोकशाही रुजली, संभाजी पा. निलंगेकरांचा देशमुखांना चिमटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी मराठवाड्यावर निझामाचे राज्य होते. पोलिस अॅक्शननंतर मराठवाड्यासह लातूर ही स्वतंत्र झाले. मात्र जिल्ह्यात लोकशाही रुजू शकली नव्हती. जिल्हा परिषदेच्या निकालात काँग्रेसचे पानिपत झाल्यामुळे जिल्ह्यात खऱ्या अर्थाने लोकशाही रुजली असे म्हणत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आजवर जिल्ह्याचा कारभार सांभाळलेल्या देशमुखांना चिमटा घेतला. जिपमध्ये मिळालेल्या स्पष्ट बहुमताच्या पार्श्वभूमीवर निलंगेकरांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते.  
 
 
निलंगेकर म्हणाले, लातूरमध्ये आजपर्यंत काँग्रेसचा एकहाती कारभार होता. विरोधकांना विश्वासात घेऊन काम करणे दूरच उलट स्वपक्षातील निवडून आलेल्यांनाही त्यांच्या मतदारसंघात काय काम करायचे याचे स्वातंत्र्य नव्हते. एका व्यक्तीची, एका कुटुंबाची राजकीय दहशत होती, असे म्हणत त्यांनी नाव न घेता देशमुखांना चिमटा घेतला. जिल्हा परिषदेच्या निकालाने जिल्ह्यातील सगळी राजकीय समीकरणे बदलली आहेत.
 
 
 आम्ही निवडणूक जाहीर झाल्यापासून एकदिलाने निर्णय घेतले. गेल्यावर्षी दुष्काळाच्या संकटकाळात केंद्र आणि राज्य सरकारने जी कामे केली ते लक्षात ठेवून लोकांनी मतदान केले. नोटाबंदीमुळे लोकांना त्रास झाला असे तकलादू मुद्दे काँग्रेसने प्रचारात आणले मात्र त्यांना लोकांनी नाकारले. 
 
 
पुतळा उभारणीतील भ्रष्टाचाराची चौकशी करणार  : जिपच्या प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलासराव देशमुखांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचे ऐकले असल्याचा उल्लेख केला होता. त्याची चौकशी करणार का? या प्रश्नावर संभाजी पाटील निलंगेकरांनी पुतळा उभारणीसह इतरही कामांत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...