आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरीत घाट्याचा सौदा बरा, पण सरकारी केंद्रात विक्री नको, दरात 4200 रुपयांपर्यंत घसरण होण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- बाजारात तुरीला हमी भावापेक्षा कमी किंमत मिळत असतानाही शेतकऱ्यांनी सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आधारभूत खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात दिसत आहे. केंद्रावर घेण्यात येणारा उत्कृष्ट दर्जाचा माल, त्यासाठी द्यावी लागणारी कागदपत्रे आणि उशिराने मिळणारे पेमेंट आदीमुळे शेतकऱ्यांना आडत बाजारातील घाट्याचा सौदा बरा वाटत असल्याचे दिसून येत आहे.
  
बाजारात नवीन तुरीची आवक सुरू होताच दरात कमालीची घसरण होऊ लागल्याने सरकारने १५ दिवसांपूर्वी जिल्ह्यात लातूर, अहमदपूर, औसा आणि चाकूर येथे अाधारभूत खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. परंतु पाचही केंद्रांवर अल्प प्रमाणातच तुरीची खरेदी झाली आहे. तुरीला हमीभाव ५०५० आहे. बाजारात ४४०० ते ५००० भाव आहे. खरेदी केंद्रावर सातबारा, पीकपेरा उतारा, बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड देणे बंधनकारक आहे. तसेच उत्कृष्ट दर्जाचा माल लागतो. इतके करूनही चेकद्वारे उशिराने रक्कम मिळते. त्यामुळे शेतकरी बाजारच गाठू लागले आहेत.
  
येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी आठ हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. त्यात ७५ टक्के तूर कर्नाटकातून, तर उर्वरित तूर परिसरातून विक्रीला आली होती. तिला कमाल ५०००, तर किमान ४४०० प्रतिक्विंटल भाव मिळाला. पंधरा दिवसांपूर्वी कमाल भाव ५२०० रुपये, तर किमान ४७०० रुपये भाव होता. परंतु त्यात २०० ते ३०० रुपयांची घसरण झाली आहे. अद्यापही सर्वत्र राशी विक्री सुरू झालेली नाही. त्याअगोदरच भाव ४४०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. बाजारात हमीपेक्षा कमी भाव मिळू लागला तरी शेतकरी आडत बाजाराचाच रस्ता धरत आहेत. 
 
केंद्रावर फक्त ९०४ क्विंटल खरेदी : गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यातील पाच आधारभूत खरेदी केंद्रांवर फक्त ९०४ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.  अहमदपूर आणि चाकूर केंद्रावर, तर एकही पोती खरेदी झालेली नाही. औसा येथे १६६, तर उदगीरमध्ये ३८ क्विंटल तूर शेतकऱ्यांनी केंद्रावर घेतली आहे. लातूरच्या केंद्रावर ७०० क्विंटल माल आला आहे. लातूरचे केंद्र नाफेडने, तर उर्वरित चार केंद्रे मार्केटिंग फेडरेशन सुरू केली आहेत.

दरात आणखी घसरण होईल   
गेल्या पाच महिन्यांपासून तुरीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने सध्या तिचे दर निम्म्यापेक्षा कमी झाले आहेत. यंदा चांगले उत्पादन निघणार असल्याचा हा परिणाम आहे. आणखी पंधरा दिवसांनंतर तुरीचा भाव ४२०० रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. -अशोक अगरवाल, आडत व्यापारी

केंद्रावर आवक वाढेल   
बाजारात जवळपास ७५ टक्के तूर कर्नाटकातील असल्याने ती खरेदी केंद्राकडे येत नाही. तसेच तुरीमध्ये ओलावाही अाहे. आपल्याकडे सर्वत्र राशी सुरू झाल्यानंतर केंद्रावर आवक वाढेल. त्यानुसार एका केंद्रावर चार ते पाच काटे लावून येणारी सर्व तूर खरेदी करण्याची तयारी फेडरेशनने केली आहे.  
-यादव सुमठाणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, लातूर
   
धनादेश तत्काळ द्यावेत   
आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या मालाचे धनादेश तत्काळ मिळत नसल्याने शेतकरी त्याकडे पाठ फिरवत आहेत. चेक तत्काळ मिळावेत म्हणून आम्ही वारंवार संबंधितांना निवेदने देऊन आंदोलनेही केली आहेत. परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.  
-राजेंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष, स्वा.शेतकरी संघटना, लातूर.    
 
 
बातम्या आणखी आहेत...