आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर महापालिका सभेतील गदारोळाला जातीय वळण, मुस्लिम संघटनांचे आयुक्तांना निवेदन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेचे लातूर संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त तेलंग यांना घेराव घालण्यात आला.छाया : तम्मा पावले - Divya Marathi
शिवसेनेचे लातूर संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त तेलंग यांना घेराव घालण्यात आला.छाया : तम्मा पावले
लातूर - लातूर महापालिकेत दोन दिवसांपूर्वी पाणीप्रश्नाच्या उपाययोजनेसाठी बोलावलेल्या सभेत निष्क्रियतेचा आरोप करीत शिवसेनेच्या नगरसेविका सुनीता चाळक यांनी महापौरांच्या दिशेने बाटली फेकली होती. त्याला उत्तर म्हणून महापौरांनी आपण पाच मुलांचा बाप असून निष्क्रिय कसे, असा सवाल विचारला होता. या प्रकरणात शुक्रवारी सकाळी महापौरांच्या समर्थनार्थ काही मुस्लिम संघटनांनी आयुक्तांना निवेदन देऊन शिवसेनेच्या नगरसेविका सुनीता चाळक यांना निलंबित करण्याची मागणी केली. याला प्रत्युत्तर म्हणून दुपारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत येऊन महापौर सभेतील प्रकाराला जातीय वळण देत असल्याचा आरोप केला. तसेच पाणीप्रश्न सोडवण्याऐवजी अश्लील शेरेबाजी करीत असल्याचा आरोप केला.

शिवसेनेच्या नगरसेविका सुनीता चाळक यांनी पाणीप्रश्नावर चर्चा करताना महापौरांच्या दिशेने बाटली फेकल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद, मुस्लिम क्रांती सेना, ग्रीन टायगर, शेर-ए-हिंद टिपू सुलतान, लष्कर ए भीमा, व्ही एस पँथर या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी आयुक्तांना दिले. शिवसेनेच्या नगरसेविका चाळक यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुस्लिम संघटना सरसावल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी ही बाब लातूर दौऱ्यावर असलेल्या संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या कानावर घातली. उदगीर दौरा अर्धवट सोडून ते तातडीने महापालिकेत आले. तोपर्यंत महापालिकेत जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, बालाजी पाटील चाकूरकर, माजी प्रमुख पप्पू कुलकर्णी, अभय साळुंके असे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. आयुक्त सुधाकर तेलंग यांच्या दालनात जाऊन सावंत यांनी महापौरांवर कारवाईची मागणी केली. महिला नगरसेविकांनी पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केल्यानंतर अश्लील शब्द वापरणारे महापौर हे प्रकरण अंगलट आल्यानंतर त्याला जातीय वळण देत असल्याचा आरोप सावंत यांनी केला. या वेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून महापालिका दणाणून सोडली.
माझी फूस नव्हती
सकाळी काही मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत येऊन मला फोन केला. त्यांनी माझ्यावर बाटली फेकल्याच्या प्रकाराला विरोध करीत चाळक यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन देत असल्याचे सांगितले. मी त्यांना नको म्हणालो, पण त्यांनी ऐकले नाही. त्यांना माझी फूस नव्हती. त्यांना माझ्याबद्दल आत्मीयता वाटत असेल, महत्त्वाच्या पदावर बसलेल्या समाजातील व्यक्तीचा अवमान त्यांना सहन झाला नसेल, असे म्हणून त्यांनी निवेदन दिले असावे. अख्तर शेख, महापौर

महापौरांवर कारवाई करा
लातूरला जातीय दंगलींचा इतिहास नाही. पाणीप्रश्नाला तोंड देत असलेल्या लातूरमध्ये महापौर अख्तर शेख जातीय तणाव पसरवू पाहत आहेत. शिवसेनेच्या महिला नगरसेविकेला सभागृहात बोलू द्यायचे नाही. त्यांनी बाटली फेकल्याचे सांगत अश्लील शेरेबाजी करायची, असले घाणेरडे धंदे शिवसेना खपवून घेणार नाही. यापुढे असे प्रकार झाल्यास शिवसेना स्टाइलने उत्तर देण्यात जाईल. संजय सावंत, संपर्कप्रमुख
बातम्या आणखी आहेत...