आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर-मुंबई एक्स्प्रेससाठी सर्व पक्ष, सामाजिक संघटना एकवटल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - बिदरपर्यंत वाढवण्यात आलेली लातूर-मुंबई एक्स्प्रेस पूर्ववत लातूर- मुंबई करण्यासाठी लातुरातील सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटना एकवटल्या असून सदर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची मालिकाच सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार स्वाक्षरी मोहीम राबवून शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच रेल रोकोही करण्यात येणार आहे.  
 
रेल्वेचा विस्तार करण्यात आल्याने लोकांत नाराजी आहे. त्यामुळे लोकभावना लक्षात घेऊन रेल्वे पूर्ववत होण्यासाठी एक्स्प्रेस बचाव समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या दररोज बैठका होत आहेत. त्यातून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच मे रोजी ‘लातूर बंद’ची हाक देण्यात आली आहे, तर नऊ मे रोजी येथील स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलकांनी निझामाबाद-पंढरपूर रेल्वे अडवण्याचा निर्णय घेतला असून सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत  रेल्वेस्थानकावर जमण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  
 
लातुरातील नागरिकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पहिल्यांदा गांधी चौकात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर   स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी लोकांच्या सह्या घेण्यात येत आहेत. ही मोहीम चार मेपर्यंत चालणार आहे. रेल्वे बिदरपर्यंत वाढवण्याचा निर्णय लातूरकरांना अंधारात ठेवून घेण्यात आला असून त्यातून सत्ताधाऱ्यांनी लातूरकरांशी दगाबाजी केल्याची भावना व्यक्त होत आहे. परिणामी, लातूरकर संतप्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आल्यानंतर प्रक्षुब्ध कार्यकर्त्यांनी खासदार सुनील गायकवाड यांचा प्रतीकात्मक पुतळाही जाळला होता.  
 
लातूर-मुंबई रेल्वे मोठ्या प्रयासाने सुरू झाल्याने ती तशीच चालू राहावी, बिदर-कुर्ला, नांदेड-कुर्ला या गाड्या नियमित सुरू कराव्यात, हैदराबाद-पुणे एक्स्प्रेस मुंबईपर्यंत वाढवावी, लातूर-तिरुपती नवी गाडी सुरू करावी, नांदेड लातूर रेल्वे मार्ग गतीने पूर्ण करावा आदी मागण्याही लातूरकरांतून होत आहेत.  
 
रेल्वे विकासासाठी उदगीर बंद  
रेल्वेच्या बिदरपर्यंतच्या विस्तारानंतर निर्माण झालेला ‘लातूर विरुद्ध उदगीर’ वाद दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे विस्ताराला लातूरकरांनी विरोध करत तीव्र आंदोलने पुकारली असताना उदगीर परिसरातील प्रवाशांना रेल्वेच्या सर्व सेवा नियमित मिळण्यासाठी चार मे रोजी  उदगीर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने उदगीर बंद पुकारण्यात आला आहे.  विस्तारित मुंबई-बिदर एक्स्प्रेस उदगीरमार्गे जात असल्याने उदगीरकरांनी रेल्वेचे जंगी स्वागत केले आहे. परंतु रेल्वेचा विस्तार केल्याने लातूरकरांना डब्यात जागाच नसल्याने लोकभावना तीव्र आहेत. परिणामी, एकाच जिल्ह्यातील दोन शहरे एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभी राहिली आहेत.
 
नव्या रत्नापूर एक्स्प्रेसची खासदार गायकवाडांची मागणी
लातूर - मुंबई-लातूर एक्स्प्रेस बिदरपर्यंत वाढवल्यामुळे लातूरमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिक खासदार सुनील गायकवाड यांनी मतदारसंघातील वाढता रोष लक्षात घेऊन बुधवारी मुंबईत मध्य रेल्वेच्या डीआरएमची भेट घेऊन नवी गाडी सुरू करण्याची मागणी केली आहे.  मुंबई-लातूर एक्स्प्रेस बिदरपर्यंत वाढवल्यामुळे लातूर शहरात खासदार सुनील गायकवाड यांच्याकडे संशयाने पाहिले जात आहे. मात्र खासदारांनी याबाबत तातडीने खुलासा करून या आंदोलनात आपण लातूरकरांसोबतच आहोत अशी भूमिका घेतली आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, आंदोलनात उस्मानाबाद जिल्ह्याचीही उडी...
 
हे पण वाचा,
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...