आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळा: वाहन भाड्यापोटी मनपात 65 लाखांची बेहिशेबी उचल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - राज्य शासनाचे अनुदान बंद झाल्यानंतर ड वर्ग महापालिकांचा कारभार लोकांनी भरलेल्या कराच्या पैशातून सुरू आहे. त्यातीलच एक असलेल्या लातूर महापालिकेमध्ये गेल्या चार वर्षांत अधिकाऱ्यांनी तब्बल ६५ लाख रुपयांची उचल वाहन भाड्यापोटी केली आहे. विशेष म्हणजे त्याचा तपशीलही महापालिकेकडे जमा केलेला नाही आणि महापालिकेनेही तो मागितलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या सरत्या काळात आणखी एका घोटाळ्याची भर पडली आहे.  

लातूर महापालिकेचा सगळा कारभार लोकांनी भरलेल्या कराच्या पैशातून होतो. मात्र लोकांच्या पैशाचा विनियोग कशा पद्धतीने होतो हे मल्लीकार्जुन भाईकट्टी यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतून उघड झाला आहे. २०१२ पासून २०१६ पर्यंतच्या कालावधीत मागवलेली माहिती पाहिली असता त्यामध्ये काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिकार नसतानाही वाहने वापरली आहेत. बहुतांश अधिकाऱ्यांनी स्वत:च्या किंवा नातेवाइकांच्या मालकीचे खासगी वाहन वापरून त्यापोटी भाडे वसूल केले आहे. टॅक्सी परवानाची अटही धाब्यावर बसवण्यात आली आहे. तसेच एका कर्मचाऱ्याकडे तर दोन विभागांचा पदभार असल्यामुळे त्याने दोन्ही विभागांकडून एकाचवेळी वाहनाचे भाडे उचलले आहे. केवळ महापालिका आयुक्त आणि मुख्य लेखाधिकाऱ्यांकडे महापालिकेच्या मालकीचे वाहन आहे.  तत्कालीन उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी विनाक्रमांकाच्या वाहनापोटी ३ लाख ६० हजारांची उचल केली आहे. सध्याचे उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी ४ लाख ९४ हजार, सहायक आयुक्त वसुधा फड यांनी तर आपल्या सासरशी संबंधित  व्यक्तीचे खासगी मालकीचे  वाहन वापरले आणि त्यापोटी ५ लाख १३६०० रुपयांची उचल केली, तर बदलून गेलेले उपायुक्त प्रदीप ठेंगल यांनीही विनाक्रमांकाचे वाहन वापरून ५ लाख १९६०० ची उचल घेतली. शहर अभियंता नवनाथ केंद्रे यांनीही ४ लाख ७३ हजार रुपये उचलले आहेत. त्याचे  विवरण या अधिकाऱ्यांनी महापालिकेत जमा केलेले नाही. यांनी वापरलेली वाहने सरकारी नियमानुसार टॅक्सी परमीटचीही नाहीत तर ती नातेवाइकांच्या नावावर असलेली खासगी वाहने आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये वाहन भाडे उचलणारे नगर अभियंता के. ए. बामणकर यांनी १ लाख ८८२१ रुपये, क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी यांनी ३३ हजार ८५८, तत्कालीन उपायुक्त धनंजय जावळीकर ६७ हजार ७४५, कर अधीक्षक ओमप्रकाश मुतंगे यांना ४ लाख ११५४७ वाहन भाड्यापोटी देण्यात आले आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाकडे तक्रार करणार असल्याचे भाईकट्टी यांनी सांगितले, तर महापालिकेच्या आयुक्तांनी याची माहिती घेऊन चौकशी करू, असे उत्तर दिले.  
 
एकाचवेळी दोन वाहनांचा भत्ता  
विशेष म्हणजे विद्युत अधीक्षक आणि देखभाल दुरुस्ती या दोन वेगवेगळ्या विभागाचे प्रमुखपद सांभाळणाऱ्या शशिकांत पत्की यांनी एकाचवेळी दोन वाहनांमधून प्रवास केल्याचा अजब प्रकार उघड झाला आहे. यातील एक वाहन बीड तर एक वाहन लातूर जिल्ह्यात नोंदणीकृत आहे. ते दोन्ही वाहने खासगी असून पत्की यांनी चार वर्षांत अनुक्रमे २ लाख ११८६० आणि ३ लाख १३५२१ अशी एकूण ५ लाख २५ हजार ३८१ रुपयांची उचल केली आहे.  
 
इतर विभागांनी उचलले २४ लाख  
महापालिकेच्या अखत्यारीत चालणाऱ्या पाणीपुरवठा, वसुली, झोन क्रमांक ए, पाणी पुरवठ्याचा देखभाल दुरुस्ती विभाग, बांधकाम विभाग, विद्युत विभाग, मनपा दवाखाना, झोन क्र. बी यातील अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २०१६ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत तब्बल २४ लाख २६७०१ रुपये उचलले आहेत. त्याचा तपशील माहिती अधिकारात विस्ताराने देण्यात आलेला नाही, यामुळे संशयाला जागा निर्माण झाली आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...