आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संक्रांतीलाही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, पालेभाज्यांची मातीमोल विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - गेल्या दोन महिन्यांपासून कोसळलेले भाजीपाल्याचे दर अद्यापही सावरलेले नाहीत. मकर संक्रांतीला दरात अपेक्षित वाढ होण्याची शक्यता होती. उलट आवक प्रचंड वाढल्यामुळे दरामध्ये विशेष वाढ झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडली. काही फळांच्या किमतीत तीनपट वाढ झाल्यामुळे व्यापाऱ्यांची चांदी झाली.  

गेल्या दोन महिन्यांपासून येथील आठवडी बाजार व मंडईमध्ये भाजीपाल्याचे दर कोसळलेले आहेत. स्थिर मागणी व पुरवठ्यात मोठी वाढ झाल्यानंतर वस्तूंच्या दरामध्ये घसरण होते या अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणेच सध्या बाजारपेठेतील उलाढाल होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज भाजीपाल्याची बोली होत आहे. मात्र, बोलीत सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पदरात निराशा पडत असल्याचे दिसत आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला वधारण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, तसे काहीच झाले नाही. अचानक भाजीपाल्याची आवक वाढली. यामुळे दरांमध्ये वाढ होऊ शकली नाही.  कोथिंबीर, मेथी, पालक, चुका, हरभरा भाजी, दोडका, उसावरच्या शेंगा, गवार आदींना कवडीमोल किंमत मिळाली. यासोबतच वांगे, टॉमेटो, कांदे, बटाट्याचे रडगाणे कायम आहे. संक्रांतीनिमित्त घरात १२ प्रकारच्या भाज्या एकत्रितपणे करण्याची परंपरा आहे. सर्व भाज्यांना मान भोजनात देण्याची धार्मिक प्रथा आहे. या प्रथेमुळे भाज्यांची विक्री वाढण्याची शक्यता होती. विक्री वाढली, मात्र तेवढाच माल आडतीवर आल्यामुळे विशेष फायदा होऊ शकला नाही.  

अधिक उत्पादन  :  खरिपातील बहुतांश पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली. यानंतर रब्बीची पेरणी शेतकऱ्यांनी केली. भाजीपाल्याच्या माध्यमातून उत्पादन घेता येईल अशी अपेक्षा होती. यामुळे त्यांनी भाजीपाल्याचीही लागवड केली होती. तसेच सध्या उसाची लागवडही मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये आंतरपीक म्हणूनही भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात आले. यामुळे सर्वत्र अधिक उत्पादन वाढल्यामुळे पुरवठा अधिक झाला.  
 
टोमॅटो कवडीमोल  
पावसाळ्याच्या दरम्यान ४० रुपये किलो दराने विक्री झालेले टोमॅटो सध्या कवडीमोल दराने विक्री होत आहेत. परंडा तालुक्यात टोमॅटो चक्क रस्त्यावर फेकण्यात आले. सकाळी टोमॅटोचा दर पाच रुपये प्रतिकिलोने सुरू होत आहे. सायंकाळ उशिरापर्यंत हा दर चक्क दोन ते तीन रुपयांवर घसरत आहे. यामुळे टोमॅटो उत्पादकांना नुकसान सहन करावे लागत आहे.  
 
सणातही दगा  
-संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र, बाजारात आवक अधिक वाढल्यामुळे अपेक्षित दर मिळाला नाही. यामुळे बाजाराने सणातही दगा दिला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  
श्रीधर माने, शेतकरी.