आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान : सूक्ष्म जीवांबाबतचा तिसरा प्रयोग येत्या दोन वर्षांत करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - पृथ्वीबाहेरच्या जगात सजीव सृष्टी अस्तित्वात असेल का, याबाबत संशोधन सुरू असून लवकरच त्याचा परिस्थितिजन्य पुरावा आम्ही देऊ. याबाबत आम्ही सकारात्मक असून पृथ्वीवरच्या अवकाशात अंतराळातून येणाऱ्या सूक्ष्म जीवांबाबतचा तिसरा संशोधन प्रयोग येत्या दोन वर्षांत आम्ही करू. त्यानंतर अनेक सत्ये प्रकाशात येतील, अशी माहिती खगोल खास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी शुक्रवारी (दि. १४) येथे दिली.    

नेताजी सुभाषचंद्र बोस स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने येथील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात डॉ. नारळीकर यांनी “अंतराळातून येणारे विचित्र वर्षाव’ या विषयावर मार्गदर्शन केले.   
डॉ. नारळीकर म्हणाले, आपले विश्व किती विराट आहे याची अजूनही पूर्ण कल्पना आपल्याला आलेली नाही. जगभरातील शास्त्रज्ञ, संशोधक याबाबत संशोधन करत आहेत. पृथ्वी-सूर्यमाला-आकाशगंगा किंवा आकाशगंगांचा समूहगट एवढेच आम्ही आज पाहू शकतोय. पण क्लस्टर ऑफ गॅलेक्सीच्या पुढे सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सी अस्तित्वात आहे का, याबाबत मी ते अस्तित्वात असल्याचे संशोधन मांडले. जागतिक स्तरावर ते मान्यही झाले; पण काही मतभेद आहेत. एकावर २१ शून्य दिल्यानंतर जी संख्या तयार होईल,  तेवढे तारे या विश्वात असावेत, असा तर्क आहे.   

वायुमंडलातून सतत पृथ्वीवर सूक्ष्म जीव येत असतात. त्यामुळेच पृथ्वीवरील सजीवसृष्टी आकाराला आली आहे. याबाबत आम्ही संशोधन केले. पृथ्वीवरच्या अवकाशात ४१ किमीपर्यंत बलून सोडून त्या बलूनला अवकाशातील सूक्ष्म जीव जे बाह्य जगतातून येत असावेत त्यांना गोळा करण्यासाठी उपकरण जोडून वर पाठवले. त्या उपकरणात पंपिंगच्या माध्यमातून ते अवकाशातले सूक्ष्म जीव गोळा केले. त्यानंतर त्यांची शास्त्रीय तपासणी केली. दोन वेळा हा प्रयोग झाल्यानंतर आम्हाला पृथ्वीवर न आढळणारे सूक्ष्म जीव सापडले. पण त्यावर आक्षेप असा आला की कदाचित मानवाला माहीत नसणारे ते सूक्ष्म जीव पृथ्वीवरचेच असावेत. पृथ्वीच्या अवकाशातले सूक्ष्म जीव बाह्य जगतातून नाही, तर पृथ्वीवरूनच वर गेलेले असावेत, अशी शंका घेता येऊ शकते. म्हणूनच आता तिसऱ्या संशोधनात आम्ही वर अवकाशात सापडलेल्या सूक्ष्म जिवांमधील कार्बन तत्त्वाचे प्रमाण मोजणार आहोत. जर त्यांच्यात पृथ्वीवरील सजीवांएवढे कार्बनचे प्रमाण आढळले नाही तर ते निश्चितच पृथ्वीवरील नाहीत. ते बाह्य जगतातून पृथ्वीकडे आले आहेत, याचा परिस्थितीजन्य पुरावा मिळेल आणि मग बाह्य जगतातील सजीवसृष्टीच्या शोधाला एक नवी दिशा मिळेल, असेही डॉ. नारळीकर यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बचत गटाचे अध्यक्ष आनंद देशमुख यांनी केले. डॉ. नारळीकर यांचा परिचय प्रा. रविशंकर झिंगरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन रमाकांत लिंबेकर यांनी केले, तर आभार श्रीपाद देशपांडे यांनी मानले.
 
अवकाशातील कचऱ्यासंदर्भात संशोधनाची गरज
परभणी  - अवकाशात संशोधनासाठी पाठवण्यात येत असलेल्या यानांची कार्यक्षमता संपल्यानंतर तेथे जमा होणाऱ्या गार्बेजसंदर्भात (कचरा) अधिक संशोधन होण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांनी शनिवारी (दि.१४) येथे केले.  
येथील शिवाजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात डॉ.नारळीकर यांनी विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या चिकित्सक प्रश्नांना उत्तरे देत प्रत्येकाला प्रश्न हे पडलेच पाहिजेत, ते विचारले पाहिजेत, त्यावर चर्चा होऊन दिशा मिळाली पाहिजे, असाही सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. व्यासपीठावर मंगला नारळीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.रविशंकर झिंगरे यांनी केले. डॉ.नारळीकर म्हणाले, विज्ञानाचे क्षेत्र खूप मोठे आहे. अवकाशातील संशोधन तर मोठ्या प्रमाणावर होत आहे. संशोधनासाठी विविध प्रकारची याने अवकाशात पाठवली जातात. या यानांची संख्या जास्त आहे.  या यानांची कार्यक्षमता संपल्यानंतर ती नष्ट होतात.   त्यामुळे  या गार्बेजसंदर्भात अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.